
फेसबुकवरील मैत्री हिरे व्यापाऱयाला चांगलीच महागात पडली आहे. परदेशातून पाठवलेल्या महागडय़ा गिफ्टच्या नावाखाली व्यापाऱयाला 1 कोटी रुपयांना चुना लावला आहे. फसवणूकप्रकरणी व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार हे हिरे व्यापारी असून त्यांचे इंस्टाग्रामवर अकाऊंट आहे. सप्टेंबर महिन्यात त्याना इंस्टाग्रामवर एक एलेक्स नावाच्या महिलेने मेसेज पाठवला.आपण लंडन येथे खासगी जहाजावर कॅप्टन असल्याचे सांगितले. त्या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. महिलेने तक्रारदाराना लग्न करणार असल्याचे भासवले. ब्रँडेड शूज, घडय़ाळ आणि अमेरिकन डॉलर्स असलेला एक व्हिडीओ तक्रारदाराना व्हॉट्सअॅपवर पाठवला. ते गिफ्ट पाठवण्यासाठी महिलेने पत्ता विचारला.
पत्ता विचारल्यानंतर दोन दिवसांनी तक्रारदाराना एक फोन आला. कस्टम विभागातून बोलत असून एलेक्स नावाच्या महिलेने गिफ्ट पाठवले आहे. ते गिफ्टचे पार्सल चार्ज आणि टॅक्स भरून ते गिफ्ट सोडवा असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने सुरुवातीला 35 हजार रुपये भरले.
पैसे भरल्यावर एलेक्स नावाच्या महिलेने आपण हिंदुस्थानात सोन्याच्या व्यवसाय सुरू करणार असून 5 लाख डॉलर्स पाठवत असल्याच्या भुलथापा मारल्या. त्यानंतर तक्रारदाराना पुन्हा फोन आला. पार्सल चार्ज आणि टॅक्सच्या नावाखाली 60 लाख 49 हजार रुपये भरण्यास सांगितले. पैसे भरल्यावर तक्रारदाराना पुन्हा फोन आला.
दिल्ली विमानतळावरून बोलतोय, एलेक्सने पाठवलेले 4 कोटी रुपये त्यांच्याकडे डॉलर्सच्या स्वरूपात जमा झाले आहेत. मोठी रक्कम दुसऱया खात्यात पाठवण्यास आरबीआयने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे दिल्लीला येऊन भेटल्यास चर्चा करून असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार हे दिल्लीला गेले. तेथे एकाला भेटले. त्याने एलेक्स नावाच्या महिलेने पाठवलेले डॉलर्स दाखवून ते हिंदुस्थानी चलनात रूपांतरित करण्यासाठी साडेसतरा लाख रुपये भरण्यास भाग पाडले.
डॉलर्सवर असलेल्या स्टॅम्प काढण्यासाठी लागणारे सोल्युशनच्या नावाखाली पैसे बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदारानी पैसे खात्यात भरले. 4 कोटी रुपये खात्यात जमा न झाल्याने तक्रारदाराना संशय आला. फसवणूक केल्याप्रकरणी तक्रारदारानी व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी फसवणूक आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.































































