
सामना प्रतिनिधी । मुंबई
स्कायवॉकवर झोपणे एका तरुणाच्या आज जिवावर बेतले. झोपेत असताना कूस बदलताना तो थेट स्कायवॉकवरून खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कुर्ला पूर्वेला घडली.
संतोष कदम (२८) असे त्या तरुणाचे नाव आहे. कुर्ला पूर्वेकडील रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या स्कायवॉकवर संतोष झोपलेला होता. दुपारी दोनच्या सुमारास कूस बदलताना तो तोल जाऊन रेल्वे फलाट क्रमांक नऊच्या बाजूस रेल्वेच्या ब्रिजखाली पडला. यात संतोषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला नेहरू नगर पोलिसांनी बेशुद्धावस्थेत राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी नेहरू नगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





























































