धक्कादायक…..पोलीस पत्नीसह चिमुकलीची केली हत्या; घटनेनंतर पतीचीही गळफास घेत आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस कर्मचारी असलेल्या पत्नीची पतीने पोटात चाकू खुपसून हत्या केली. त्यानंतर चिमुकलीचीही हत्या केली. या हत्याकांडानंतर पतीनेही गळफास घेत आत्महत्या केली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून या हत्याकांडामागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

पोटात चाकू खुपसून महिला पोलीस कर्मचारी व आपल्या चिमुकल्या मुलीची निर्घृण हत्या करून पतीनेही विहिरीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी चिखली शहरात सकाळी उघडकीस आली आहे. हत्या झालेली महिला चिखली पोलीस ठाण्यात कार्यरत असून तिचे नाव वर्षा किशोर कुटे (दंदाले) आहे. तिच्या चिमुकलीचाही पोटात चाकू खुपसून निर्घृण खून करणारा पतीनेही कवठळ शिवारात विहिरीत दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. चिखली येथील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात हे हत्याकांड घडले आहे. पतीचे नाव किशोर जर्नाधन कुटे (रा. खैरव) असे असून त्याने चिखली तालुक्यातील कवठळ येथील गांगलगाव रोडलगत असलेल्या विहिरीत गळफास घेतल्याचे आढळून आले. चिखली व अंढेरा पोलीस या घटनेचा तपास करत असून या हत्याकांडाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

किशोर कुटे याने या मायलेकींचा पोटात चाकू खुपसून खून करून घटनास्थळावरून पोबारा केला. नंतर गांगलगाव रोडनजीकच्या विहिरीत गळफास घेत आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांची वर्तवली आहे. कवठळ येथे गांगलगाव रोड लगत असलेल्या विहिरीत दोरीच्या साह्याने अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आढळून आले होते. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

विहिरीचे शेतमालक विष्णू हिम्मतराव वाघमारे हे नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता शेतात गेले असता डांबर रोडवर काळ्या रंगाची स्कुटी उभी असलेली त्यांना दिसली. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीत गळफास घेतलेली व्यक्ती त्यांना दिसून आली. अंढेरा पोलीस ठाण्याला माहिती देताच पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता दोरी कमकुवत असल्याने मृतदेह विहिरीत पडला. त्यानंतर खाटेच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला. चिखली येथील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात पोलीस कर्मचारी महिलेसह तिच्या दीड वर्षीय चिमुकलीची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. तर कवठळ परिसरातील मृतदेह हा संबंधित पोलीस कर्मचारी वर्षा दंदाले-कुटे यांच्या पतीचा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पत्नी व मुलीची हत्या करून पतीनेही आत्महत्या केली असावी, असा कयास बांधला जात होता. अधिक तपास चिखली व अंढेरा पोलीस करत आहेत.