
सुमारे 48 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर आता सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे तेल वितरक कंपन्याकडून सांगण्यात आले. रविवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 8 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 19 पैसे वाढ करण्यात आली.
या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोल 88.16 रुपये प्रतीलिटर तर डिझेल 77.54 प्रतिलिटर झाले आहे. तर नवी दिल्लीत पेट्रोल 81.46 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 71.07 प्रतिलिटर झाले आहे. चेन्नईत पेट्रोल 84.53 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 76.55 रुपये प्रतिलिटर झाले आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 83.03 आणि डिझेल 74.64 रुपये प्रतिलिटर झाले आहे. ग्ल् काही दिवस आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर स्थिर असल्याने देशातील पेट्रोल डिझेलचे दरही स्थिर होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असल्याने देशातही पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. शनिवारी पेट्रोलच्या किंमतीत 15 पैसे प्रतिलिटर तर डिझलेच्या किंमतीत 20 पैसे प्रतिलिटर अशी वाढ करण्यात आली होती. तर शुक्रवारी पेट्रोलच्या दरात 17 पैसे तर डिझेलच्या दरात 22 पैसे प्रतिलिटर अशी वाढ करण्यात आली होती. पेट्रोलच्या दरात 22 सप्टेंबरनंतर तर डिझेलच्या दरात 2 ऑक्टोबरनंतर करण्यात आलेले हे मोठे बदल आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमती आणि देशातील इतर कर याचा विचार केल्यानंतर तेल विकरण कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे दर ठरवण्यात येतात.

























































