
देशभरात पेट्रोलची दिवाळी सरू आहे. इंधनाच्या किमतीने नवा विक्रम केला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सर्वसामांन्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून शनिवारी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या प्रतिलिटर प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे पेट्रोलच्या किमतीने शंभरी गाठली तर डिझेलही गोवा आणि बंगळुरूसह 12 राज्यांत शंभरीपार पोहोचले आहे.
सप्टेंबरपासून पेट्रोलच्या किमतीत 15 वेळेस तर डिझेलच्या किमतीत 18 वेळेस वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.49 रुपये लिटर तर मुंबईत 111.43 रुपये लिटरवर गेले आहे. तर मुंबईत डिझेलचे दर 102.15 रुपये लिटर तर दिल्लीत 94.22 रुपये लिटर आहे. देशातील अनेक राज्यांत पेट्रोल–डिझेलच्या किमतीने शंभरी गाठली आहे. त्यात मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगढ, बिहार, केरळ, कर्नाटक, लडाख या राज्यांत पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत.
केंद्र सरकारकडून 33 टक्क्यांची वसुली
‘करांच्या माध्यमातून पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर ग्राहकांच्या खिशातून केंद्र सरकार जबरदस्तीने वसुली करत आहे’, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतीवरून चिदंबरम यांनी मोदी सरकारवर वसुलीचा आरोप केला असून मोदी सरकार आतापर्यंतचे सर्वात ‘लोभी सरकार’ असल्याचेही म्हटले आहे. पेट्रोलच्या किमतीच्या एकतृतीयांश भाग हा केंद्र सरकारचा कर आहे. एखाद्या वस्तूवर 33 टक्के कर लादणे ही जबरदस्तीने वसुली करण्यासारखेच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पेट्रोलसाठी जेव्हा ग्राहक 102 रुपये प्रति लिटर मोजत असतात तेव्हा यामध्ये 42 रुपये तेल कंपन्यांकडे जातात. यात कच्च्या तेलावरच्या प्रक्रियेचाही समावेश आहे. 33 रुपये केंद्र सरकारकडे आणि 24 रुपये राज्य सरकारकडे कराच्या स्वरूपात जातात. तर 4 रुपये डीलरकडे जातात. म्हणजे पेट्रोलच्या किमतीवर जवळपास 33 टक्के वसुली केंद्र सरकारकडून केली जात असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले.




























































