
इंधन दरवाढीमुळे जनता हैराण असतानाच सातारा जिह्यातील फलटण तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई-पुणे-सोलापूर जाणारी पेट्रोल पाइपलाइन फोडल्याची घटना सासवड गावाजवळ उघडकीस आली. ही पाइपलाइन फोडल्याने शेतात आणि विहिरी पेट्रोलने भरल्या आहेत.
यामुळे पीकांचे अतोनात नुकसान झाले असून, पाणी दूषित झाल्याने मासे, बेडूक, साप मृत्यूमुखी पडले आहेत. याप्रकरणी लोणंद पोलिसांत पेट्रोल कंपनीने तक्रार दाखल केली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोल चोरीच्या उद्देशानेच पाइपलाइप फोडल्याची प्राथमिक माहिती आहे.
गेले काही दिवस पेट्रोल -डिझेलच्या किमती झपाटय़ाने वाढत चालल्याने जनप्रक्षोभाचे वातावरण आहे. पेट्रोलने शंभरी गाठल्याने सर्व हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ही घटना उघडकीस आली. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची मुंबई – पुणे – सोलापूर अशी पेट्रोल वाहून नेणारी 223 किलोमीटरची उच्चदाब पाइपलाइन फलटण तालुक्यातील सासवड गावाजवळ अज्ञातांनी फोडली. पेट्रोल चोरीच्या उद्देशानेच हे काम झाले असावे, असा तर्क आहे.




























































