
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यायमूर्ती तात्यासाहेब आठल्ये कला, वेदमूर्ती शं. रा. सप्रे वाणिज्य आणि विधिज्ञ दादासाहेब पित्रे विज्ञान महाविद्यालयाच्या आंतरशाखीय संशोधन केंद्रामध्ये भौतिकशास्त्र आणि भूगोलशास्त्र या विषयात विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही पदवी संपादन करण्यासाठी सुविधा निर्माण झाली आहे.
नुकतीच मुंबई विद्यापीठाकडून यासाठी मान्यता मिळाली असून संबंधित विषयात पदव्युत्तर स्तरापर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले आहे. सध्या महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात पाच विद्यार्थी डॉक्टरेट पदवीसाठी संशोधन करत असून लवकरच या विभागात विद्यार्थी क्षमता वाढणार असल्याचेही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी नमूद केले.
























































