सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंभारमाठमध्ये शासकीय, फार्मसी महाविद्यालय होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील कुंभारमाठमध्ये शासकीय डी. फार्मसी व बी. फार्मसी महाविद्यालय सुरू होण्याची कार्यवाही राज्याच्या तंत्रशिक्षण संचलनालयामार्फत सुरू आहे. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना मुंबईत किंवा गोव्यात जाऊन शिक्षण घेण्याची गरज भासणार नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय डी. फार्मसी व बी. फार्मसी महाविद्यालय नसल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रत्नागिरी, कोल्हापूर, गोवा, मुंबई व पुण्यात शिक्षणासाठी जावे लागते. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दुसऱया जिल्ह्यात जाणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. त्यामुळे कुंभारमाठमध्ये फार्मसी कॉलेज सुरू करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा फार्मसी कृती समितीचे अध्यक्ष व कुडाळ-मालवणच्या लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने कुंभारमाठमध्ये फार्मसी महाविद्यालय सुरू करण्याची बाब तपासून सविस्तर अहवाल सादर करण्याची कार्यवाही तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत सुरू असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.