कारागृहात कैद्यांसाठी फोन सेवा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्या  कैद्यांचे नातेवाईक अथवा वकील हे प्रत्यक्ष भेटीसाठी कारागृहात जात नाहीत अशा कैद्यांसाठी कारागृह प्रशासनाने दूरध्वनी सेवा पुन्हा कार्यान्वित केली आहे. यामुळे एकाकी पडलेल्या कैद्यांना फोनद्वारे त्यांच्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधता येणार आहे.

राज्यातील कारागृहातील कैद्यांचा मानसिक ताणतणाव दूर होण्यासाठी वर्ष 2014 पासून कारागृहांमध्ये दूरध्वनी सुविधा सुरू करण्यात आली होती, मात्र कोविडमुळे ही सेवा ठप्प पडली. पण अपर महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार कैद्यांसाठी असलेली ही दूरध्वनी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

ज्या कैद्यांना त्यांचे नातेवाईक भेटायला जात नाहीत किंवा क्वचितच मुलाखत होते अशाच कैद्यांना महिन्यातून तीन वेळा दूरध्वनीवरून प्रत्येकी 10 मिनिटे बोलता येणार आहे. याशिवाय ज्या कैद्यांचे वकील समक्ष कारागृहात भेटीला जात नाहीत अशा कैद्यांना महिन्यातून दोन वेळा 10 मिनिटे दूरध्वनीवर बोलण्याची सुविधा देण्यात येणार आहे.