परवानगीशिवाय फोटो-व्हिडीओ शेअर करता येणार नाही! ट्विटरची नवी पॉलिसी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी वंशाचे पराग अग्रवाल यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर ते आता अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. नुकतीच ट्विटरने नवी पॉलिसी जाहीर केली आहे. त्यानुसार एखाद्या युजर्सच्या परवानगीशिवाय त्याचे फोटो-व्हिडीओ इतर युजर्स शेअर करू शकणार नाहीत. नवी नियमावली लागू करण्याचा उद्देश छळविरोधी धोरणांना अधिक मजबूत करणे आणि महिला युजर्सना सुरक्षित ठेवणे असा आहे.

आतापर्यंत युजर्स इतर युजर्सचे फोटो-व्हिडीओ त्याच्या पूर्वपरवानगीशिवाय शेअर करू शकत होते. मात्र ट्विटरच्या नवीन धोरणानुसार यापुढे इतरांचे फोटो-व्हिडीओ शेअर करताना परवानगी घ्यावी लागणार आहे. पह्टो किंवा व्हिडीओ यासारख्या वैयक्तिक गोष्टी शेअर केल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेचे उल्लंघन होऊ शकते. त्यामुळे भावनिक आणि शारीरिक हानी होऊ शकते असे ट्विटरचे म्हणणे आहे. याचा अर्थ असा नाही की पह्टो-व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करण्यापूर्वी त्यामधील सर्व व्यक्तींच्या परवानगीची आवश्यकता असेल; परंतु त्यापैकी कोणी तो फोटो-व्हिडीओ ट्विटरवरून हटवण्याची विनंती केली तर तो हटवावा लागेल.

ट्विटरचा लोगो बदलणार

ट्विटर सध्या सीजनल लोगोवर काम करीत आहे. ट्विटरच्या लोगोवर असणाऱया चिमणीला फेस्टिव्हलच्या हिशेबाने बदलले जाणार आहे. कंपनी सध्या या फीचरवर काम करतेय. याशिवाय ट्विटवर रिअॅक्ट होण्यासाठी चार स्मायली ऑप्शन मिळणार आहेत.