जादुई चेहरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धनेश पाटील,[email protected]

रीना अगरवाल… एक सशक्त अभिनेत्री… उत्तम नृत्यांगना आणि कोणत्याही छायाचित्रकाराला हवा असलेला जादुई चेहरा… ही तिची मर्मस्थाने…

भाषा ही अडथळा न मानता आपल्या विशुद्ध आणि सहज वाणीने केवळ हिंदीच नव्हे तर मराठी रुपेरी पडद्यावरही आपला अभिनय त्याच ताकदीने सादर करत रसिकांवर आपल्या कलेची मोहिनी घालणारी आणि अल्पावधीतच आपला वेगळा असा चाहता वर्ग तयार केलेली गुणी अभिनेत्री म्हणजे रीना अगरवाल. रीना सशक्त अभिनेत्री तर आहेच, शिवाय एक उत्तम नृत्यांगना आणि फोटोग्राफरला हव्या असलेल्या, कोणत्याही लुकला मिळवून घेईल अशा जादुई चेहऱयाची, ताकदीची मॉडेलदेखील आहे हे विशेष.

रीना तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करेल अशी गुणी अभिनेत्री. नव्या युगात वावरणारी, हसऱया चेहऱयाची आणि पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा असलेली अभिनेत्री, परंतु रीनाचा सोज्वळ चेहरा हा पारंपरिक वेशभूषेतही तितकाच खुलून दिसू शकतो याची चुणूक तिने तिच्या याआधीच्या सिनेमांतून दाखवली होती. हाच तिचा पारंपरिक लुक हेरून ‘फोटोंच्या गोष्टी’ या सदरासाठी रीनाचं फोटोशूट करायचं असं मी ठरवलं. रीनाशी याविषयी बोलून तिचं शूट निश्चित करण्यात आलं.

त्यानुसार तिचं कॉस्च्यूम, मेकअप, हेअर हे ठरवण्यात आलं. वेशभूषा आणि दागिने यांची कलात्मक बाजू प्रिया कळंबे यांनी यासाठी उत्तम सांभाळत रीनाचा गोड चेहरा अधिक खुलवला. विजू माने प्रॉडक्शनच्या ‘स्टुडिओ 108’ या स्टुडिओत तिचं हे फोटोशूट आयोजित करण्यात आलं होतं. लाल रंगाची साडी, हातात मोत्यांचा भरगच्च चुडा, नाकात मोत्यांची नथ, कानात मोठाले झुमके, गळ्यात कलाकुसरीने सजलेले भरगच्च हार आणि दागिने या सगळ्या पारंपरिक पेहरावात रीनाचा चेहरा अधिक खुलला. वेगवेगळ्या प्रकाश रचना करून रीनाच्या अनेक भावमुद्रा मला कॅमेराबद्ध करता आल्या.

शूटदरम्यान आणि त्यानंतर रीनाने तिचा जीवनप्रवास अलगद उलगडून सांगितला. अनेक व्यावसायिक जाहिरातींसाठीची मॉडेलिंग तर मराठी, हिंदी सिनेमे आणि मालिका यातून रीनाचा गोड चेहरा गेले एक दशक सतत झळकत राहिला असून नृत्य, अभिनय आणि मॉडेलिंग या क्षेत्रात लीलया वावरत या सर्वच क्षेत्रांत आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करत रीनाने आजवर आपला यशाचा आलेख कायम चढता ठेवला आहे.

पुण्यातलं सदाशिव पेठ हे रीनाचं मूळ जन्मगाव. रीना याच परिसरात लहानाची मोठी झाली. इथल्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेत असताना तिला नृत्याने लळा लावला आणि इथेच तिची नाळ या कलेशी जोडली गेली. पुढे पुण्यातल्या एस.पी. कॉलेजमधून तिने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. शाळेपासून नृत्याचा जोपासलेला छंद तिने महाविद्यालयीन काळातही कायम ठेवला आणि अनेक स्पर्धांमधून आणि कार्यक्रमांतून याच सादरीकरण सुरूच ठेवलं. पुढे काही काळ ती व्यावयासिक  लोकनृत्यात  रमलीही. या व्यावसायिक  नृत्याच्या कामाच्या सादरीकरणासाठी मध्ये मध्ये तिने मुंबई गाठली. याच मुंबईने तिचं  बालवयापासून तिने  बघितलेलं  एअरहोस्टेस  बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. जेट एअरवेज या कंपनीत झालेल्या एअरहोस्टेसच्या महत्त्वाच्या पदासाठी तिची निवड 850 उमेदवारांतून करण्यात आली होती हे विशेष. तिने ही जबाबदारी एक वर्षभर सांभाळलीही, परंतु कलेची आस उराशी बाळगलेली रीना इथे फार न रमता वर्षभरानंतर पुन्हा अभिनयाकडे वळली.

डिस्ने चॅनल इंडियाच्या ‘क्या मस्त है लाइफ’ या मालिकेतून 2009 साली रीनाचा अभिनय क्षेत्राचा श्रीगणेशा झाला आणि तिने मागे वळून पाहिलेच नाही. यानंतर नितीन देसाई दिग्दर्शित ‘अजिंठा’ सिनेमात काम करण्याची संधी तिला मिळाली आणि या संधीचं सोनं करत तिने नृत्य अभिनेत्रीची भूमिका ठामपणे बजावली. मराठीत रीनाचं हे पदार्पण तिच्या कारकीर्दीसाठी महत्त्वाचं ठरलं. पुढे तिच्या अनुभवाच्या जोरावर तिची निवड आमीर खान सहकलाकार असलेल्या ‘तलाश’ या सिनेमासाठी झाली. यात ‘सविता’ हे महत्त्वाचं पात्र तिनं रंगवलं होतं. त्यानंतर ‘झाला भोबाटा’, ‘बहन होगी तेरी’, ‘देव देव्हाऱयात नाही’ (आगामी सिनेमा), ‘31 दिवस’ या मराठी सिनेमांत तिने आपला सशक्त अभिनय सादर केला, तर डिस्ने चॅनल इंडियाच्या ‘क्या मस्त है लाइफ’नंतर ऍण्ड टीव्हीच्या ‘एजंट राघव – क्राईम ब्रॅंच’ या मालिकेतून तिचा चेहरा घराघरात पोहोचला.

छोटय़ा पडद्यावर आणि रुपेरी पडद्यावर आपला अभिनय सादर करून स्वतःचा वेगळा चाहता वर्ग तयार केलेल्या रीनाने आजवर अनेक व्यावसायिक जाहिरातींसाठीही काम केले असून मॉडेलिंगच्या क्षेत्रातही तिने आपला वेगळा दबदबा निर्माण केला आहे. मराठी, हिंदी सिनेमे, म्युझिक अल्बम्स, हिंदी मालिका आणि मॉडेलिंग क्षेत्रात वावरणाऱया रीनाला भाषा ही कधीच अडथळा न वाटता उलट त्यावर पकड मिळवून ती सहज सादर करण्याची नेहमीच तिने तयारी दाखवल्याचं आजवरच्या तिच्या यशाच्या चढत्या आलेखावर नजर टाकल्यानंतर समजते. रीना सध्या तिच्या ‘देव देव्हाऱयात नाही’ या आगामी मराठी सिनेमावर काम करत असून तिचे आणखी काही प्रकल्प येऊ घातले असल्याचं ती आनंदाने सांगते.