छायाचित्र‘कला’

313

आसावरी जोशी,[email protected]

उद्या जागतिक छायाचित्र दिन… फोटोग्राफी… अर्थात छायाचित्रकला… आज ही कला केवळ फॅशन किंवा निसर्ग छायाचित्रण यांच्यापुरतीच मर्यादित राहिली आहे… पण जेव्हा छायाचित्राला हस्तकलेची जोड मिळते तेव्हा ती खऱया अर्थाने छायाचित्र‘कला’ होते…

कॅमेरा कधीही खोटं बोलत नाही… व्यक्तिशः सांगायचं तर लहानपणापासून कानावर पडलेलं वाक्य… जेव्हा कॅमेरा म्हणजे काय हेही कळत नव्हतं.

अख्खं जग आपल्या प्रतिमेत सामावून घेऊन आपल्यासमोर जसंच्या तसं उभं करण्याची ताकद कॅमेऱयात असते. लहानपणापासून या कॅमेऱयाचाच सहवास लाभल्याने कॅमेऱयाची भाषा खूप चटकन समजते, उमगते. कॅमेऱयाला कशाचंच वावडं नाही. समोरच्या कोणत्याही गोष्टीची हुबेहूब प्रतिमा तो उतरवतो. अगदी कोणताही भेदाभेद मध्ये न आणता… निबीड… निळंभोर आकाश… स्वच्छंदी पक्षी… क्षणात रूपं पालटणारे ढग… निसर्गाची भव्यता… सह्याद्रीची दिव्यता… इतिहासाची सखोलता… सृष्टीचे चिरंतन संगीत… हिरवाईची उत्कटता… पानगळीची खिन्नता… प्राण्यांची निरागसता… हे झाले केवळ निसर्गापुरते…

माणसाचे अंतरंग या कॅमेऱयाइतके इतर कशातूनही व्यक्त झाले नसेल… त्याचे सौंदर्य… त्याच्या भावभावना… चेहऱयाची… शरीराची प्रमाणबद्धता… चेहऱयावर उमटणाऱया अंतरंगातील ना ना कळा… चेहऱयावर उमटणारी अस्पष्टशी रेषही कॅमेरा सहज टिपतो. चेहऱयाआडचे चेहरे हा कॅमेराच समोर आणतो.

हे सारे झाले सजीवाबद्दल. या भावभावना टिपणं कदाचित सोपं, पण निर्जिवामागची सजीवताही कॅमेरा सहज टिपतो. निर्जिवतेआड दडलेलं छुपं वास्तव जगासमोर येतं ते कॅमेऱयामुळे… मग ते वास्तव एखादे नकोसे सत्य समोर आणते किंवा अमूर्त… अनाकलनीय कलात्मकता म्हणून जगासमोर मिरवते. छायाचित्राची ही न्यारी दुनिया… खरोखरच अद्भुत… सत्यासत्यतेची परिमाणे शोधणारी… वास्तवता दाखवणारी… वास्तवातून आभासी चित्र निर्माण करणारी.

photography-3

जागतिक छायाचित्रण दिन

उद्या 19 ऑगस्ट… जागतिक छायाचित्रण दिन. माणसांच्या प्रतिमा, घटना इत्यादी जतन करण्यासाठी हजारो वर्षांपासून चित्रांची मदत घेतली जात होती आणि जेमतेम दोनेकशे वर्षांपूर्वी छायाचित्र कला म्हणजे फोटोग्राफीचा शोध लागला. साधारणतः 1826-27 मध्ये नाईसफोर यांनी पहिले छायाचित्र घेतल्याची नोंद सापडते. ज्येष्ठ छायाचित्रकार एस. पॉल यांचा जन्मदिवस जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्याविषयी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा बरेच संदर्भ सापडत गेले. प्रख्यात छायाचित्रकार रघु राय यांचे ते मोठे बंधू. एका छायाचित्रकाराला त्याने विचारले होते की अंडय़ाचे छायाचित्र पांढऱया पार्श्वभूमीवर कसे काढता येईल… याचे उत्तर त्या छायाचित्रकाराला शेवटपर्यंत देता आले नाही. पॉल यांच्या कॅमेऱयाने माणूस व निसर्ग तेवढय़ाच ताकदीने टिपला. फॅशन फोटोग्राफी… जाहिरात फोटोग्राफी… स्ट्रीट फोटोग्राफी… पत्रकारितेतील फोटोग्राफी ही वर्गवारी ते कधीच मानत नव्हते. स्वतः 25 वर्षे पत्रकारितेतील छायाचित्रकार म्हणून भरीव कार्य करूनही त्यांनी छायाचित्रकलेला कधी विशिष्ट चौकटीत बंदिस्त केले नाही.

कृष्णधवल काळ

एस. पॉल यांची माहिती घेता घेता मन सहज कृष्णधवल काळात जाऊन पोहोचले. आता बदलत्या काळानुरूप छायाचित्रकला ग्लॅमरस, डिजीटल आणि सहज सोपी, हातातली झाली असली तरी ही कला खरं तर छाया-प्रकाशाचे तंत्र असते. आता जरी कृष्णधवल छायाचित्रकला असंगत होत चालली असली तरी त्याची स्वतःची एक वेगळी खुमारी असते… स्वतःचे असे वेगळे सौंदर्य असते.

पूर्वी कॅमेरा इतका सहज सर्वसामान्यांच्या हातात नव्हता… मोबाईल असण्याचा काही प्रश्नच नव्हता… छायाचित्रं काढण्यासाठी होते ते फोटो स्टुडिओ. या स्टुडिओत जाऊन फोटो काढणे म्हणजे एक सोहळाच. सहकुटुंब फोटो काढणे, मुलाखतीसाठी छोटा आयताकृती फोटो, मुलगी दाखवण्याची प्राथमिकता म्हणजे फोटो, आठवणीतल्या व्यक्ती स्मरणात ठेवण्यासाठी फोटो… लग्नकार्य… वाढदिवस सोहळे… एक ना दोन… या सगळ्या जीवनावश्यक गोष्टींसाठी छायाचित्रं आणि हे क्षण टिपणारा… जिवंत करणारा छायाचित्रकार ही फार महत्त्वाची व्यक्ती त्या काळात होती. बऱयाचजणांचे छायाचित्रकारही फॅमिली डॉक्टरप्रमाणे ठरलेले… त्यामुळे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध… समोरच्या व्यक्तीतील अधिक-उणे या छायाचित्रकारांना सहज ठाऊक असल्यामुळे उणे झाकून अधिक अधिकाधिक ठळक कसे होईल याचा प्रामाणिक प्रयत्न करणे छाचित्रकारांच्या हाती… आणि तेही आपले पुरेपूर कसब यात लावायचे.

photography-2

हस्तकलेचे अनेक पैलू जोडलेले

आजच्या काळातील छायाचित्र कला ही केवळ कॅमेऱयाभोवतीच फिरते. पण खरे पाहता या छायाचित्र कलेला हस्तकलेचे अनेक पैलू जोडलेले…

आठवणीतल्या व्यक्तीची आठवण जागी ठेवण्यासाठी फोटोखेरीज अजूनही दुसरे माध्यम नाही. तेव्हाही नव्हते. एकुलता एखादा असलेला छोटासा फोटो घेऊन फोटो स्टुडिओ गाठायचा आणि येथे तो फोटो मोठा करणे, त्यातील खराब झालेला चेहरा हुबेहूब पूर्ववत करणे यामागे त्या छायाचित्रकाराचे कसबी हात कामाला लागायचे. मुळात मुंबईत ही अशी एनलार्जमेंटची कामं करणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच एखादे छायाचित्रकार होते. दादरच्या व्ही. जी. जोशींचे नाव यासाठी प्रामुख्याने घेतले जायचे. ही एनलार्जमेंट्स तयार व्हायची केवळ ब्लेडच्या सहाय्याने… खराब झालेल्या छोटय़ा फोटोवरून फोटो मोठा केला जायचा… आणि तो पुसट, खराब झालेला चेहरा केवळ ब्लेडच्या सहाय्याने त्याच्या मूळ रूपात ठळक, ठसठशीत होत जायचा. दिवसाचा प्रकाश, ब्लेड आणि माफक कृष्णधवल रंग या एवढय़ाच साधनांच्या आधारे तो कोणाच्या तरी आठवणीतला चेहरा सजीव भासत त्याच्या नातलगांच्या चेहऱयावर हसू आणायचा आणि छायाचित्रकाराच्या तासन्तास केलेल्या मेहनतीचे सार्थक झालेले असायचे.

हीच गोष्ट तैलरंगातल्या छायाचित्रांची. छोटासा फोटो मोठा करून तैलरंगाच्या सहाय्याने अक्षरशः देखणा, सजीव व्हायचा. येथे तर फार कसबी छायाचित्रकारच लागायचा. महिनोन्महिने हे काम चालायचे. फोटोची एनलार्जमेंट स्टॅण्डवर लावून त्यावर तैलरंग भरणे… मला वाटते मुंबईत ही कलात्मक छायाचित्र कला फक्त याच जोशी फोटो स्टुडिओमध्ये होत असावी.

आजच्या कोणत्याही प्रतिथयश छायाचित्रकाराला या कलेची माहिती नाही… आणि एवढी मेहनत घेण्याची तयारीही नाही. आजची छायाचित्रकला ही केवळ फॅशन फोटोग्राफी आणि अगदी फार तर निसर्ग छायाचित्र कलेपुरतीच मर्यादित राहिली आहे.

छायाचित्रकला ही खरं तर कृष्णधवल रंगात विशेष खुलणारी. अजूनही काही छायाचित्रकार या दोन रंगांत खेळायचा प्रयत्न करतात. यामध्येही सेफिया टोनची मजा विषयातील खोली अधिकच वाढवते. आकार, रंगछटा, विषय या गोष्टी छायाचित्रात महत्त्वाच्या असतात… आणि याखेरीज महत्त्वाची ठरते चौकट. समोरच्या कोणत्याही विषयाला ठरावीक चौकटीत बंदिस्त करून, देखणे करून त्यातील वास्तव लोकांसमोर आणणे म्हणजेच छायाचित्रकला.

आज अनेक आधुनिक कॅमेरे, लेन्सेस यांच्या मदतीने छायाचित्रकला खुलते, सजते. पण या आधुनिक छायाचित्रणासोबत असलेली हस्तकला आजच्या छायाचित्रकारांकडून जोपासली गेली, वाढवली गेली तर आपल्या मातीतील छायाचित्र कलेचा दर्जा अजून उंचावेल.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या