
धावत्या बेस्ट बसमध्ये एका वकील महिलेशी अश्लिल कृत्य करून पसार झालेल्या नारायण उदय महंतो (38) या विकृत तरुणाला दादर पोलिसांनी अखेर पकडले. आरोपी वॉचमनचे काम करत असून त्याला अँटॉप हिल येथून ताब्यात घेण्यात आले.
पश्चिम उपनगरात राहणाऱया महिला वकील या 4 तारखेला सकाळी दादरहून वरळीला बेस्ट बसने निघाल्या होत्या. त्याच बसने नारायणदेखील प्रवास करत होता. प्रवासादरम्यान नारायण वारंवार वकील महिलेच्या अंगचटीला जात आक्षेपार्ह कृत्य करू लागला. महिलेने त्याला हटकल्यानंतर तो विकृत आगारबाझरच्या स्टॉपवर उतरला. त्यानंतर महिलेने संध्याकाळी दादर पोलीस ठाण्यात जाऊन घडल्या प्रकरणाबाबत तक्रार दिली. या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दादर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी किळसवाणे कृत्य करून पळून जात असताना वकील महिलेने त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले होते. त्याआधारे दादर पोलिसांनी तपास करून विकृत तरुण नारायण महंतो याला अँटॉप हिल येथून उचलले. तो प्रतीक्षा नगरात राहत असून शीव येथे वॉचमनचे काम करतो.



























































