
सध्या सोशल साईट्स आणि काही वृत्तपत्रांतील बातम्यांमधून कोरोना महामारीत होणाऱया रुग्णांच्या मृत्यूला देशातील 5जी मोबाइल तंत्रज्ञान चाचण्यांतील रेडिएशन कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या सर्व अफवाच असून कोरोना काळातील मृत्यू आणि 5जी चाचण्या यांचा दुरान्वयानेही संबंध नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय माहिती जनसंपर्क विभागाने (पीआयबी) आपल्या निवेदनात केले आहे. जनतेने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन पीआयबीने केले आहे.
जगातील अनेक देश मोबाईलच्या 5जी सेवेचा वापर सुरक्षितरीत्या करीत आहेत. त्यांना कोणताही त्रास झालेला अद्याप आढळलेला नाही. शिवाय 5जी सेवा आणि कोरोना महामारी यांचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यू एचओ) केले असल्याची माहिती सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक एस. पी. कोचर यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.




























































