पायलटने ‘पॅन-पॅन’ सिग्नल पाठवत मागितली तात्काळ मदत, दिल्ली-इंदूर एअर इंडिया एक्सप्रेस विमानाचे आपत्कालीन लँडिंग

air india express

एअर इंडिया एक्सप्रेसच्या पायलटने जीवघेणा नसलेला आपत्कालीन परिस्थिती दर्शविणारा ‘पॅन-पॅन’ सिग्नल पाठवला, त्यानंतर इंदूर विमानतळाच्या धावपट्टीजवळ अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकेची तातडीने व्यवस्था करण्यात आली. दिल्लीहून इंदूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेस विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. पायलटने आपत्कालीन परिस्थिती दर्शविणारा ‘पॅन-पॅन’ सिग्नल जारी केला. विमान इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावर २० मिनिटे उशिराने सुरक्षितपणे उतरले. विमानात एकूण १६१ प्रवासी होते.

इंदूर विमानतळ संचालक विपिनकांत सेठ यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, शुक्रवारी सकाळी दिल्लीहून इंदूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेस विमानाच्या एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्व खबरदारी घेण्यात आली. विमान सकाळी ९:५५ वाजता इंदूर विमानतळावर उतरले, तर त्याची नियोजित वेळ सकाळी ९:३५ होती.

विमानतळ संचालकांनी सांगितले की, विमानातील सर्व १६१ प्रवासी आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. सेठ म्हणाले की, पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ला ‘पॅन-पॅन’ सिग्नल पाठवला. त्यानंतर मानक कार्यपद्धती (एसओपी) नुसार विमानतळावर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. ‘पॅन-पॅन’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर वैध सिग्नल आहे. हा सिग्नल सागरी आणि हवाई रेडिओ संप्रेषणात वापरला जातो. विमान वाहतूक क्षेत्रात ते तात्काळ मदतीची आवश्यकता दर्शवते. ही मदत जीवघेणी नसून, या सिग्नलद्वारे क्रूने ताबडतोब एटीसी आणि ग्राउंड सर्व्हिसकडून मदत मागितली.