पिंपरी चिंचवडमध्ये होणार लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी, नियमावली जाहीर; काय सुरू, काय बंद

3786

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज रविवारी नियमावली घोषित केली. या नियमावलीनुसार शहरातील सर्वच्या सर्व अस्थापना, किराणा दुकाने, कंपन्या पहिले पाच दिवस पूर्णत: बंद राहणार आहेत. केवळ दूध विक्रेते, वैद्यकीय सेवा, मेडिकल दुकानांसह शासकीय प्रकल्पांची कामे सुरू राहणार आहेत. 19 जुलै ते 23 जुलै या कालावधीत मात्र शिथिलता देण्यात आली आहे.

पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा वेग प्रचंड वाढला आहे. शहरात रोजच तीनशे ते चारशेहून अधिक नवे रुग्ण आढळू लागल्याने शहरवासियांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन घोषित करावा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार दि. 13 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजतापासून गुरुवार दि. 23 जुलै रोजी रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजेच दहा दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यावेळी नेमकी नियमावली जाहीर करण्यात आली नव्हती.

रविवारी महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी लॉकडाऊच्या कालावधीसंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसान शहरातील किराणा दुकाने, सर्व प्रकारची किरकोळ व ठोक दुकाने, इतर सर्व प्रकारचे व्यवसाय, सर्व प्रकारच्या कंपन्या बंद राहणार आहेत. सार्वजनिक, खासगी क्रिडांगणे, उपहारगृह, लॉज, हॉटेल, मॉल, रिसॉर्ट, बाजार, केश कर्तनालये, सलून, स्पा, ब्युटी पार्लर, आडत दुकाने, भाजीपाला मार्केट, फळ विक्रेते, आठवडा बाजार, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, खासगी शिकवणी वर्ग, सार्वजनिक व खासगी बससेवा, सर्व प्रकारची बांधकामे, चित्रपट गृह, व्यायामशाळा, वाचनालये, करमणूक केंद्र, बार, सर्व प्रकारची सभागृहे, जलतरण तलाव, मंगल कार्यालये तसेच ऑनलाईन पोर्टलवरून खाद्यपदार्थ पुरवठा करणार्‍या संस्थांसाठी पहिले पाच दिवस पूर्णत: बंद राहणार आहेत.

तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रमांनाही पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थना स्थळेही या कालावधी बंद राहणार असून कसल्याही प्रकारची होम डिलिव्हरी या कालावधी सुरू राहणार नाही. 19 तारखेपासून सकाळी 8 ते दुपारी 12 या कालावधीत जिवनावश्यक व अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने सुरू राहणार आहेत. यामध्ये किराणा दुकान, दूधविक्रेते, आठवडे बाजार, फेरीवाले, भाजी, फळांचे विक्रेते मटन, चिकण, अंडी विक्री करणारी दुकाने उघडता येणार आहेत. तसेच 19 तारखेपासून इ कॉमर्सच्या वेबसाईट सुरू राहतील तसेच त्यांचा पुरवठाही सुरळीत होईल.

वरील बाबी बंद ठेवण्यात येणार असल्या तरी काही सुविधा सुरू ठेवल्या जाणार आहेत. यामध्ये घरपोच दूध वितरण करता येणार असून सर्व खासगी व शासकीय वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहेत. शहरातील सर्व मेडिकल दुकाने या काळात उघडी राहतील. औषध व अन्न उत्पादन प्रक्रिया करणारे उद्योग, त्यांचे पुरवठादार नियमितपणे आपले उद्योग सुरू ठेवतील मात्र त्यांना एमआयडीसीच्या पोर्टलवरून परवाना घ्यावा लागणार आहे. महापालिकेची विकासकामे, मेट्रो, स्मार्टसिटीचे तसेच राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे उद्योग या कालावधीत सुरू राहणार आहेत. जे उद्योग सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यांना आपल्या पुर्वपरवाना घेतलेल्या व निश्चित केलेल्या वाहनातून आपल्या कर्मचार्‍यांची वाहतूक करावी लागणार आहे.

या उद्योगांना मिळणार परवानगी
आपल्या खासगी अथवा एमआयडीसीच्या जागेत ज्या कंपन्या अथवा उद्योग आहेत त्यांन कंपनी चालविता येणार आहे. मात्र त्यासाठी लॉकडाऊनच्या दहा दिवसांच्या कालावधीत कंपनीमधील कामगारांच्या राहण्याची व भोजनाची सोय त्यांना करावी लागणार आहे. कंपनीबाहेर येता येणार नाही. असाच नियम बांधकामांच्या साईटसाठीही लागू करण्यात आला आहे. जे बांधकाम व्यवसायिक आपल्या कामगारांची राहण्याची व भोजनाची सोय करतील त्यांना परवानगी घेऊन आपली साईट चालू ठेवता येणार आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू, औषधे, तयार केलेले अन्नपदार्थ घरपोहोच देण्यासाठी सकाळी 8 ते 10 या वेळेत परवानगी राहणार आहे.

शेतीप्रक्रिया उद्योगही सुरू राहणार
पिंपरी-चिंचवड शहरात तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये शेतीप्रक्रिया करणार्‍या उद्योगांना लॉकडाऊनच्या कालावधी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यावर कोविडच्या नियमावलीची बंधने पाळून काम सुरू ठेवता येणार आहे. याशिवाय सर्व वैद्यकीय व्यवसायिक, परिचारिका, प्यारामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी, अ‍ॅम्ब्युलन्स यांना शहर, राज्यांतर्गत तसेच आंतरराज्य वाहतुकीसाठी परवानगी राहणार आहे.

या सुविधाही राहणार सुरू
रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या वेळेनुसार तसेच नियम व अटींसह बँका व एटीएम लॉकडाऊनच्या काळात सुरू राहणार असून पाणीपुरवठा करणारे टँकरलाही परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत पेट्रोलपंप, गॅसपंपही सुरू राहणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना गॅस व पेट्रोलचा पुरवठा करण्याची अट ठेवण्यात आली आहे. न्यायालयासह सर्व शासकीय कार्यालये ही दहा टक्के मनुष्यबळासह सुरू ठेवण्यासही मान्यता देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी जर लग्न समारंभ, स्वागत समारंभासाठी लॉकडाऊनच्या कालावधीतील परवानगी घेतली असेल तर हे कार्यक्रम या कालावधीतही 20 लोकांपेक्षा कमी उपस्थितीत पार पाडता येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या