
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईत पाणी कपात सुरू असतानाच शुक्रवारी रात्रीच्या सुमाराला शीव अँटॉप हिल परिसरातील पाण्याची पाइपलाइन फुटली. यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. त्यामुळे अँटॉप हिल, वडाळा, शीव कोळीवाडा, सीजीएस कॉलनी परिसराला पाणीपुरवठा न झाल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल झाले.
शीव अँटॉप हिल येथील मोनो स्थानक आणि सारस्वत बँकेजवळील पाण्याची पाइपलाइन काल मध्यरात्रीच्या सुमाराला फुटली. ही माहिती पालिकेच्या जलविभागाला मिळताच तत्काळ पाणीपुरवठा बंद केला. मात्र तोपर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले. अँटॉप हिल, शीव कोळीवाडा, वडाळा, सीजीएस कॉलनी इत्यादी परिसरात पाणी पुरावठय़ावर याचा परिणाम झाला. पाणी पूर्ववत करण्यासाठी पालिकेच्या जल विभागाने पाइपलाइन दुरुस्तीचे काम हाती घेतले. शनिवारी सकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, असा दावा प्रशासनाने केला. परंतु, सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. त्यामुळे पाण्याविना रहिवाशांचे हाल झाले. पावसाने यंदा पाठ फिरवल्याने धरणे आटू लागली आहेत. धरणातील पाणीसाठय़ाचा अंदाज घेऊन पालिकेने 10 टक्के कपात लागू केली. मात्र पाइपलाइन फुटल्याने त्यात अधिक पडली आहे.





























































