
खचाखच भरून धावणाऱया लोकल ट्रेनचा प्रवास नजीकच्या काळात आरामदायी बनण्याची चिन्हे आहेत. रेल्वे प्रशासनाच्या 238 एसी लोकल ट्रेन खरेदीच्या योजनेला गती देण्यात आली आहे. वाढत्या प्रवाशी संख्येचा विचार करून 12 डब्यांऐवजी 15 किंवा 18 डब्यांच्या एसी लोकल ट्रेनची निर्मिती केली जाणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) सुधारित प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
मुंब्रा येथे पाच प्रवाशांचा लोकल गर्दीने बळी घेतला. त्या घटनेनंतर लोकल ट्रेनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आणि नवीन 238 एसी लोकल ट्रेन खरेदीच्या योजनेला गती मिळाली आहे. मुंबई महानगरातील वाढत्या रेल्वे प्रवाशी संख्येचा विचार करून एमआरव्हीसीने दोन आठवडय़ांपूर्वी राज्य सरकारला 238 एसी लोकल ट्रेनसंबंधी सुधारित योजना सादर केली होती. जवळपास 2,856 डब्यांच्या नवीन ट्रेन पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर धावणार आहेत.
नवीन डब्यांसाठी याच महिन्यात निविदा जारी केल्या जाणार आहेत. सध्याच्या एसी लोकलच्या ताफ्यात 12 डब्यांच्या गाडय़ा आहेत. त्यांना डबे वाढवता येणार नाहीत. तथापि नवीन 238 एसी लोकल ट्रेनची 15 किंवा 18 डब्यांची रचना करणे शक्य आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱयांनी सांगितले. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी) अंतर्गत 2,856 एसी कोच खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी 21 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
सहा वर्षांपूर्वींची योजना, खर्चात 9 टक्क्यांची वाढ
वास्तविक एसी लोकल ट्रेन खरेदी करण्याची योजना सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2019मध्ये तयार करण्यात आली होती. आता सहा वर्षांनंतर एसी लोकल खरेदीचा प्रस्ताव मार्गी लागत आहे. त्यामुळे खर्चामध्ये 9 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. आम्ही भविष्यातील गरज विचारात घेऊन 15 आणि 18 डब्यांच्या एसी लोकलची निर्मिती करणार आहोत. त्यासाठी येत्या काही दिवसांत निविदा मागवली जाईल. ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्यासाठी कर्ज घेतले जाणार नाही. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन समान प्रमाणात खर्चाचा भार पेलेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.