
सामना ऑनलाईन । मुंबई
राज्यात लागू केलेल्या प्लॅस्टिकबंदीचा सकारात्मक परिणाम दादर चौपाटीवर दिसू लागला आहे. दरवर्षी पावसाळय़ात प्लॅस्टिक पिशव्यांचा प्रचंड खच चौपाटीवर पसरलेला असायचा. आता प्लॅस्टिकचा वापर कमी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून दादरच्या इंदू मिलपासून प्रभादेवीपर्यंतच्या चौपाटीवर प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी रुपेरी चंदेरी वाळू व शंख-शिंपल्यांचा थर दिसू लागला आहे. दादर चौपाटीवर प्लॅस्टिकची भरती ओसरण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबईकरांनी प्लॅस्टिकबंदीला सहकार्य केल्यामुळे मुंबईतल्या चौपाट्यांना रुपेरी वाळूचे गतवैभव प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही.मुंबईतल्या चौपाट्यांवर खासकरून पावसाळय़ाच्या दिवसांत भरतीच्या लाटांसोबत प्रचंड प्रमाणावर प्लॅस्टिक वाहून येते. दादर चौपाटीही त्याला अपवाद नाही. दररोज या चौपाटीवर प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा खच पडलेला दिसतो. दररोज या भागातील चौपाटी साफ करताना समुद्रकिनार्यावरून किमान एक ट्रॉली भरून प्लॅस्टिकच्या पिशव्या व कचरा भरण्यात येतो. दररोज जेवढा कचरा उचलला जातो तेवढाच कचरा भरतीच्या पाण्याबरोबर समुद्रकिनार्यावर वाहून येतो. पण गेल्या काही दिवसांपासून चैत्यभूमीपासून इंदू मिल ते थेट प्रभादेवीच्या बॉम्बे डाइंग बंगल्यापर्यंतच्या किनार्यावरील प्लॅस्टिकचा थर दिसेनासा झाला आहे.
दरवर्षी पौर्णिमेला समुद्राला प्रचंड उधाण येते. तेव्हा समुद्राच्या पोटातील प्लॅस्टिकसह सर्वच कचरा किनार्यावर वाहून येतो. शुक्रवारच्या पौर्णिमेच्या भरतीनंतरही यंदा प्लॅस्टिकचा कचरा फार कमी झाल्याचे निरीक्षण सफाई कामगारांनी नोंदवले. राज्याच्या पर्यावरण विभागाने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लागू केलेल्या प्लॅस्टिकबंदीचे मुंबईकरांनी मनापासून स्वागत केले आहे. त्यामुळे मुंबईच्या चौपाट्यांवर रुपेरी चंदेरी वाळूची पुळण दिसू लागली आहे.
प्लॅस्टिकची भरती थांबल्याने हा संपूर्ण समुद्रकिनारा स्वच्छ दिसत आहे. सर्वत्र रुपेरी वाळू व त्यावर शंख-शिंपले सर्वत्र दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर दादर चौपाटीवर वाळूची पुळण दिसत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. दररोज चौपाटी साफ करणार्या सफाई कामगारांनीही या समुद्रकिनार्यावरील प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे प्रमाण कमी झाल्याचे मान्य केले.

























































