
चंद्रपूरातील उसगाव (घुग्गुस) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात प्लॅस्टिकसारखा तांदूळ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे तांदूळ शिजतही नसल्याने ते नेमके काय आहे, याची चौकशी करून अहवाल द्या, अशी मागणी उसगावच्या सरपंच निविदा ठाकरे यांनी केली आहे.
चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत उसगाव येथील जिल्हा परिषदच्या उच्चप्राथमिक शाळेत सोमवारी विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार म्हणून शासनातर्फे आलेले धान्य वितरित करण्यात आले. त्यातील काही तांदळाचे दाणे शिजलेच नाहीत. याबाबत पालकांनी मंगळवारी सरपंच निविदा ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. ठाकरे यांनी चाचपणी केली असता तक्रारीत सत्य आढळून आले. पौष्टिक आहारातील तांदूळ भिजला नाही, परंतु तो तव्यावर टाकला असता तो वितळू लागला. त्यामुळो तो प्लास्टिकचा तांदूळ असावा अशी चर्चा उसगावमध्ये आहे. हा प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका आहे. याची चौकशी करावी अशी मागणी सरपंच निविदा ठाकरे यांनी केली आहे.
कंत्राटदार म्हणतो 50 किलो तांदळात अडीच किलो पौष्टिक तांदूळ
पालकांची तक्रार आल्यावर या प्रकरणी विचारणा केली असता पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने 50 किलो तांदळात शासनातर्फे मिळालेला अडीच किलो पौष्टिक तांदूळ असल्याचे त्याने सांगितले. पण हा तांदूळ खरंच पौष्टिक आहे का, असा सावाल उपस्थित होत आहे.

























































