
सामना ऑनलाईन । मॉस्को
क्रोएशियाची अडखळती सुरुवात… पहिल्या गोलनंतर इंग्लंडचा बचावात्मक पवित्रा… मध्यांतरानंतर क्रोएशियाने केलेले आक्रमण आणि अतिरिक्त वेळेतील दबावात क्रोएशियाची सरशी अशा उत्तरोत्तर रंगत गेलेल्या लढतीत क्रोएशियाने २-१ गोल फरकाने विजय मिळवून प्रथमच फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक देऊन इतिहास घडविला. आता १९९८ सालातील जगज्जेता आणि तिसऱयांदा फुटबॉल वर्ल्डकपची फायनल गाठणाऱया बलाढय़ फ्रान्सशी क्रोएशियाची रविवारी (दि.१५) किताबी लढत रंगणार आहे.
पाचव्या मिनिटाला पहिला गोल
सुरुवातीपासूनच क्रोएशियाविरुद्ध इंग्लंडचे पारडे जड मानले जात होते. दुसऱया उपांत्य लढतीची सुरुवातही तशीच झाली. इंग्लंडचा डिफेंडर किरयेन ट्रिपेअरने मिळालेल्या फ्री किकवर क्रोएशियाच्या गोलरक्षकाला चकवत अप्रतिम गोल केला अन् पाचव्याच मिनिटाला आपल्या संघाचे खाते उघडले. पूर्वार्धात इंग्लंडकडे १-० अशी आघाडी होती, मात्र मध्यांतरानंतर सामन्याचे चित्र पालटले. पूर्वार्धात आक्रमक असलेल्या इंग्लंडने बचावात्मक पवित्रा घेतला तर पिछाडीवर पडलेल्या क्रोएशियाने आक्रमक खेळाचा अवलंब केला. अखेर ६८व्या मिनिटाला क्रोएशियाचा अनुभवी खेळाडू इवान पेरिसीच याने अफलातून हाय जम्प किक मारत भन्नाट गोल केला. इंग्लंडच्या गोलरक्षकाला कळायच्या आत चेंडू जाळीत धडकला अन् क्रोएशियाने लढतीत १-१ अशी बरोबरी साधली. ९० मिनिटांच्या निर्धारित वेळेत ही बरोबरी कायम राहिली.
अतिरिक्त वेळेतील थरारक खेळ
वर्ल्डकपचा उपांत्य सामना अतिरिक्त वेळेत गेल्याने उभय संघांवर दडपण येणे साहजिकच होते. दोन्ही संघांनी सावध खेळ केल्याने अतिरिक्त वेळेच्या पहिल्या १५ मिनिटांच्या हाफमध्ये गोल होऊ शकला नाही. त्यामुळे दुसऱया १५ मिनिटांच्या हाफमध्ये इंग्लंड आणि क्रोएशियाच्या खेळाडूंवरील दबाव आणखी वाढला, मात्र या स्पर्धेत क्रोएशियाने सलग दोन सामने अतिरिक्त केळेत जिंकलेले होते. त्यामुळे मानसिकदृष्टय़ा इंग्लंडने कच खाल्ली, पण क्रोएशियन खेळाडूंनी हार मानली नव्हती. शेवटी १०९व्या मिनिटाला मारियो मँजुकिचने सुरेख गोल करून क्रोएशियाला २-१ असे आघाडीवर नेले. अंतिम शिटी वाजली अन् क्रोएशियाने फायनलमध्ये धडक मारून ऐतिहासिक कामगिरी केली.



























































