
हॉटेल मालक बी. आर. शेट्टी यांच्याकडे खंडणीची मागणी करणे तसेच त्यासाठी त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने आज आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. विशेष न्यायाधीशांनी हा निकाल देतानाच याच गुन्हय़ाप्रकरणी दोषी ठरलेल्या राजन गँगच्या इतर पाच जणांनाही आठ वर्षांसाठी तुरुंगात खडी फोडायला पाठवले. यापूर्वी छोटा राजन याला खोटा पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी तसेच ज्येष्ठ पत्रकार जे. डे. हत्याकांड प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.
३ ऑक्टोबर २०१२ रोजी रात्री शेट्टी ते आपल्या कारने अंधेरीहून चालले असताना बाईकवरून आलेल्या राजन गँगच्या गुंडांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात शेट्टी हे गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना तातडीने अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई क्राइम ब्रँचला या प्रकरणात अंडरवर्ल्डचा सहभाग असल्याचे धागेदोरे सापडले. अधिक चौकशीअंती यामध्ये छोटा राजन आणि त्याच्या साक्षीदारांचा समावेश असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे छोटा राजनसह त्याच्या इतर पाच साथीदारांविरुद्ध ‘मोक्का’अंतर्गत खटला चालविण्यात आला.

























































