
झोपडपट्टी विभागात नळजोडणीसाठी परवानाधारक प्लंबरची सुरू असलेली दादागिरी पालिका मोडून काढणार आहे. यापुढे नळजोडणी घेताना सहाय्यक अभियंत्याची परवानगी ग्राह्य धरली जाणार आहे. यामुळे नागरिकांना वेठीस धरणार्या प्लंबर (नळ कारागीर)ची मनमानी थांबणार आहे.
झोपडपट्टी विभागात नवीन नळजोडणी देताना किंवा जुनी जलवाहिनी बदलण्याच्या कामाकरिता परवानाधारक प्लंबरची परवानगी बंधनकारक आहे, परंतु हे परवानाधारक प्लंबर परवानगीसाठी अवाच्या सवा रक्कम आकारतात. शिवाय खणलेल्या रस्त्याच्या किंवा पदपथाच्या दुरुस्तीचेही पैसे आकारतात. हा सर्व भार झोपडपट्टी विभागातील गोरगरीब रहिवाशांकर येतो. त्यामुळे आता नगरसेवक निधीतून नवीन जलजोडणी करताना किंवा जलजोडणी बदलताना परवानाधारक प्लंबरऐवजी सहाय्यक अभियंत्याची परवानगी आवश्यक करण्यात येणार आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अर्जदाराला परवानाधारक प्लंबरशिवय जलजोडणीची परवानगी देण्यात येईल. शिवाय या कामासाठी आकारण्यात येणारे पदपथ दुरुस्ती शुल्कही झोपडपट्टीवासीयांकरिता माफ करण्यात येणार आहे. मात्र नळजोडणीची कामे अर्जदार स्वतः प्लंबरमार्फत करणार असतील तर मात्र रस्ते, पदपथ, चरभरणी, पुनर्बांधणीसह एकूण खर्च अर्जदारानेच करणे भाग आहे.
जलवाहिनी जमिनीखालूनच
नळजोडणी मंजूर झाल्यानंतर जलमापकाच्या (मीटर) पुढची कामे परवानाधारक प्लंबरमार्फत करून घेणे आवश्यक करण्यात येणार आहे. यामध्ये जलवाहिन्या जमिनीखालून जाणे बंधनकारक आहे. तसेच गटारे असलेल्या ठिकाणी गटाराच्या बाहेरून जलवाहिन्या टाकणे बंधनकारक करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे.
























































