
डॉ. श्रीराम लागू एक बहुमुखी प्रतिभा असलेले अभिनेते होते. आपल्या अफलातून अभिनयाने त्यांनी गेली अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांचा अभिनय, त्यांचे व्यक्तित्व विसरता येणे अशक्यच आहे. त्यांच्या आठवणी हृदयात कायम राहतील अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. लागू यांना बुधवारी आदरांजली वाहिली.
मराठी रंगमंच आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या संवेदनशील अभिनयामुळे प्रसिद्ध असलेल्या डॉ. श्रीराम लागू यांनी मंगळवारी वयाच्या 92 व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधानांसह देशातील अनेक दिग्गजांनी डॉ. लागू यांना आदरांजली वाहिली. यात ममता बॅनर्जी, पृथ्वीराज चव्हाण, परेश रावल, मधुर भांडारकर वगैरेंचाही समावेश आहे. डॉ. लागू यांच्या चाहत्यांच्या दुःखात मीदेखील सहभागी आहे, असेही मोदी ट्विटमध्ये पुढे म्हणाले.



























































