मोदी महाराजांच्या रुपात, तर शहा तान्हाजी; व्हिडीओतून पुन्हा अपमान

1977
bjp-shivaji-maharaj-morf-image

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीं तर नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा मॉर्फकरून एक व्हिडीओ ट्विटरवरून व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमी महाराष्ट्रासह देशातील नेटकऱ्यांनी भाजपविरोधात संताप व्यक्त केला आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पोलिटिकल कीडा’ या ट्विटर हँडलवरून ‘तान्हाजी’ या चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करण्यात आले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि समर्थकांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी मोदींची तुलना करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याविरोधात महाराष्ट्रातील जनतेने आवाज उठवून देखील हे प्रकार थांबवण्यात आलेले नाहीत. गेल्या आठवड्यात भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात जय भगवान गोयल यांनी लिहलेले ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्याला शिवसेनेसह महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी जनतेने कडाडून विरोध केला. यामुळे अखेर भाजपला हे पुस्तक मागे घेत असल्याचे जाहीर करावे लागले होते. या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी गुपचूप बसलेल्या काही संघटनांनी यानंतर शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी मोदींना दाखवणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना नेते खासदार यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेला लक्ष्य करू पाहणाऱ्या संघटना आता काय प्रतिक्रिया देणार, त्यांच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत, असेही संजय राऊत म्हणाले. शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या त्या सगळ्या संघटना आता कुठे गेल्या, असा खोचक सवालही राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ तत्काळ मागे घ्यावी अन्यथा याचे परिणाम फार वाईट होतील, असा इशारा दिला आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ ट्विट केला गेलेला नाही. तसेच या चित्रफितीमध्ये कुठेही भाजपचे नाव नसले तरी केजरीवाल यांना उदयभान राठोड दाखवले असून नरेंद्र मोदी व अमित शहा हे कोंढाणा किल्ल्याप्रमाणे दिल्लीसाठी युद्ध करायला तयार असल्याचे दाखविण्यात आले आहे. शाहीन बाग से उन्होंने वोट बँक की राजनिती शुरू की है, आखरी दांव हम खेलेंगे, असे संवादही यात घालण्यात आले आहेत. चित्रफितीच्या शेवची दिल्ली इलेक्शन 2020 असे इंग्रजीतील वाक्य असून भगव्या झेंड्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहा हे तनाजीच्या वेषात व त्याच्यासोबत ‘शहा जी’ अशी अक्षरेही या व्हिडीओत झळकतात.

आपली प्रतिक्रिया द्या