
सामना प्रतिनिधी, मुंबई
महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील- चिखलीकर यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेड येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 6 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता असर्जन कौठा मैदानावर जाहीर सभा होणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजीतसिंह ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर आदींची उपस्थिती राहणार आहे. सभेच्या योग्य नियोजनासाठी वेगवेगळय़ा समित्या गठीत करण्यात आल्या असून सभेच्या जवळच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हय़ातून किमान दोन लाख नागरिक, महिला या सभेला उपस्थित राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष राम पाटील-रातोळीकर, महानगराध्यक्ष संतुकराव हंबर्डे, व्यापारी महाआघाडीचे दिलीप कंदकुर्ते, डॉ. अजित गोपछडे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, प्रवीण साले, व्यंकटेश साठे यांची उपस्थिती होती.





























































