
जनतेसाठी आजवर कुठलेच काम न करणारी काँग्रेस -राष्ट्रवादी घड्याळाच्या काट्यासारखी लहान भाऊ 10 व मोठा भाऊ 10 यावरच अटकून राहत आता अखेरची घटका मोजत असल्याची टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. जालना जिल्ह्यातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या प्रचारार्थ परतुरातील सभेत ते बोलत होते. येथील टेलिफोन भवन परिसरात आयोजित जाहीर सभेला केद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जालना विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री अर्जुन खोतकर, परतुर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर, घनसावंगी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. हिकमत उढाण, खासदार संजय जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे,जितुंर विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर, पार्थीचे उमेदवार मोहन फड, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर, भागवत कराड आदींची उपस्थिती होती.
परतुर येथील सभेला अभुतपुर्व गर्दी पाहून पंतप्रधान मोदी यांनी जमलेल्या जनसुमदायास ‘नमस्कार.. मराठवाड्याच्या पावनभुमीस वंदन’ अशी मराठीतुन भाषणाला सुरवात करत मराठवाडा हा गर्दीचा रेकाँर्ड मोडत असल्याची प्रशंसा करत केली. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, भक्तप्रल्हाद, ज्योतीबा, डॉ. आंबेडकर यांच्या सारख्या महापुरुषांची भुमी आहे. महाराष्ट्राने सातत्याने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्तीचा आवाज महाराष्ट्रात बुलंद झाला आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्राच्या याच संस्कृतीला धक्का पोहोचवितात. लोकसभेच्या निवडणूकीत महाराष्ट्रातील जनतेने जनभावना दाखविली आहे. आता हिंदुस्थानात नामदारांच्या मनमानीने नाही तर कामगारांच्या
इच्छेने कामे होतील.
विरोधकांना मोदींची सणसणीत चपराक, ‘कश्मीर आणि महाराष्ट्राचा संबंध काय’ वर दिलं उत्तर
विरोधी पुढाऱ्यांना देशाची भावना समजत नाही. देशहित आणि देश रक्षा या विषयावर सगळ्याचा एकच आवाज आला पाहिजे, पण प्रत्येक गोष्टीत राजकीय पोळी भाजणारे नेते देश हिताच्या बाबीही मानत नाहीत. काँग्रेसवर जोरदार टिका करतांना मोदी म्हणाले की, काँग्रेसमध्ये आता नवीन ट्रनिंग देण्यात येणार असून यात राष्ट्रवादाचा धडा शिकविला जाणार आहे. याचा अर्थच असा आहे की, आजची काँग्रेस देशभक्तांची नाही, घराणेशाहीच्या ओझ्याखाली राष्ट्रवाद दबला आहे. परिवाराच्या भक्तीतच काँग्रेसला राष्ट्रभक्तीच दिसत आहे. याच मुळे देशात काँग्रेस शेवटीची घटका मोजत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा समाचार घेतांना मोदी म्हणाले की, जगातील भ्रष्टाचाराचे सर्व प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअरस्ट्राईकच्या वेळी विर जवान आणि सैनिकांचा अपमान केला. आताही कश्मीरमध्ये 370 कलम रद्द केल्यावरही त्याच प्रमाणे विरोध चालू आहे. 370 वर एवढे जर प्रेम असेल तर 370 ला दफन केले असून तिकडे जावून त्यावर चादर चढवावी, असेही मोदी म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले की, अहंकारीने त्यांना देश, जनता, दिसत नाही. त्यामुळे ते उलटी भाषा बोलतात. त्यामुळे जनधार असलेले अनेक नेते त्यांना सोडून जात आहेत. राज्यातील विविध योजनेचा उल्लेख करत गेल्या साठ वर्षात आजवरच्या मराठवाड्यातील तिन्ही मुख्यमंत्री यांना या राज्याचा विकास साधता आला नाही. त्याकाळात पाणी, रस्ते, विज या समस्यामुळे नागरीकांना तरसावे लागले. मात्र गेल्या पाच वर्षाच्या काळात राज्यातील भाजपा महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो अनुशेष भरून काढत त्यापेक्षा जास्त विकास करून दाखवत उल्लेखनिय कामगिरी बजावली असल्याचे ते म्हणाले.

























































