
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. बरनाला येथे आयोजित ‘काँग्रेस मजदूर महारॅली’मध्ये बोलताना खरगे यांनी मोदींची तुलना ट्रम्प यांच्या धोरणांशी केली. मोदी सरकार देशाला पुन्हा गुलामीच्या गर्तेत ढकलत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख ‘सरेंडर मोदी’ असा करत म्हटले की, पंतप्रधान आज अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पूर्णपणे झुकले आहेत. ट्रम्प जे सांगतात, तेच मोदी हिंदुस्थानात करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान खाली घालून केवळ नाक रगडण्याचे काम सुरू असून या दबावापोटीच देशाची विकला जात आहे. मोदींच्या या धोरणांमुळे हिंदुस्थानी मजूर पुन्हा एकदा ‘बॉण्डेड लेबर’ अर्थात वेठबिगार होण्याच्या मार्गावर असून, देशाला पुन्हा गुलाम बनवण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न असल्याचा आरोप खरगे यांनी केला.
यावेळी खरगे यांनी केवळ भाजपवरच नव्हे, तर त्यांच्या ‘बी’ टीमवरही निशाणा साधला. मोदींचे अंधानुकरण करणारी ही टीम देशाला अधोगतीकडे नेण्यास मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.


























































