UN ने नामदारांना विचारून मसूदबाबतचा निर्णय घ्यायला हवा होता का; मोदींचा काँग्रेसवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जयपूर

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमांइड मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. त्याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या हिंडौनमधील सभेत काँग्रेसवर कडाडून टीका केली. युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे नाव न घेता मोदींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. मॅडमजी, नामदारांना विचारून संयुक्त राष्ट्रांनी मसूदबाबतचा निर्णय घ्यायला हवा होता का असा सवाल त्यांनी केला. मॅडमजी, नामदारजी तुम्ही ज्यांना साहब आणि आदराने जी म्हणतात अशा व्यक्तीला आम्ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करू का, तुमची काही हरकत नाही ना असे संयुक्त राष्ट्रांनी विचारायला हवे होते का अशा शब्दांत मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. तसेच पाकिस्तान गोळी चालवेल तर मोदी तोफेने उत्तर देईल असेही ते म्हणाले.

आज जगभरात हिंदुस्थानचा दबदबा वाढला आहे. देशाचा सर्वात मोठा शत्रू असणाऱ्या मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. पाकिस्तानात ऐशोआरामात राहणारा दहशतवादी म्होरक्या हिंदुस्थानवर कुरघोड्या करत होता. पाकिस्तानने त्याला आश्रय दिला होता. त्यामुळे कारवाई करण्याची गरज होती. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकनंतर आता सुयंक्त राष्ट्रांनी पाकिस्तानवर स्ट्राईक केला आहे. त्यांची मिजास संयुक्त राष्ट्रांनी उतरवली आहे. आता मसूद पाकिस्तानात राजरोस फिरू शकणार नाही. पाकिस्तानही दहशतवाद्यांना आश्रय देताना विचार करेल. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास जवान सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुका सुरू असताना अबूधाबी, यूएई, रशियासारखे देश नरेंद्र मोदीला पुरस्कार देऊन गौरव करत असल्याने काँग्रेस अस्वस्थ असल्याचा आरोपही त्यांनी केला.

देशाच्या पूर्व आणि दक्षिण किनारपट्टीला फनी चक्रीवादळाचा धोका आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामीळनाडू, पद्दुचेरीतील राज्य सरकारच्या संपर्कात आहे. या संकटाचा समाना करण्यासाठी या राज्यांना एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत करण्यात आली आहे. एनडीआरएफ, नौदल, प्रशासन या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत. आपण स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले.