
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यासाठी राज्य सरकारबरोबरच स्थानिक जिल्हा प्रशासन जोरदार कामाला लागले आहे. पंतप्रधानांसाठी उभारण्यात येणाऱ्या सोयीसुविधांमध्ये कोणतीही कसर राहू नये म्हणून अक्षरशः पैशाची उधळपट्टी केली जात आहे. पंतप्रधानांकरिता मालवणजवळ तीन ठिकाणी तात्पुरते हेलिपॅड उभारण्यात येणार असून त्यावर तब्बल 2 कोटी 30 लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. जनतेच्या पैशाची ही कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षाचे औचित्य साधून आणि हिंदुस्थानच्या आरमार उभारणीत महाराजांचे योगदान लक्षात घेऊन यंदाचा ‘नौदल दिन’ सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात राजकोट या ठिकाणच्या 43 फूट उंच शिवरायांच्या पुतळय़ाचे अनावरण करणार आहेत. मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मालवणजवळ तीन ठिकाणी हेलिपॅड तयार केली जात असून त्यावर वारेमाप खर्च केला जात असल्याचे बांधकाम विभागाच्या ई-निविदेवरून स्पष्ट होत आहे.
पोलिसांची रंगीत तालीम!
सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण येथे सोमवार 4 डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या नौदल दिन आणि त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा या पार्श्वभूमीवर मालवणात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून या सुरक्षा व्यवस्थेची शनिवारी रंगीत तालीम घेण्यात आली.



























































