
अमेरिकेकडून होत असलेल्या चौफेर आर्थिक नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘गर्व से कहो हम स्वदेसी है’ असा नारा दिला. हिंदुस्थानात जास्तीत जास्त वापरल्या जाणाऱया वस्तूंचे उत्पादन करा, स्वदेशी वस्तूंची विक्री करा आणि स्वदेशी वस्तूंचीच खरेदी करा, असे आवाहन मोदींनी केले.
जीएसटी परिषदेने कमी केलेल्या जीएसटीच्या नव्या दरांची अंमलबजावणी उद्या 22 सप्टेंबरपासून होणार आहे. त्याचे निमित्त साधून मोदींनी आज देशाला संबोधित केले. ‘‘नव्या जीएसटीमुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. ग्राहकांसह उत्पादक आणि विव्रेत्यांनाही त्याचा फायदा होईल. एक प्रकारे जीएसटी बचत उत्सव सुरू होत आहे,’’ असे मोदी म्हणाले.
‘‘देशाच्या स्वातंत्र्याला जशी स्वदेशीच्या मंत्राने ताकद मिळाली, त्याचप्रमाणे देशाच्या समृद्धीलाही स्वदेशीच्याच मंत्राने शक्ती मिळेल. जीएसटी कमी झाल्यामुळे छोटय़ा उद्योगांना मोठा फायदा होणार आहे,’’ असा दावा त्यांनी केला.
‘मेड इन इंडिया’ वस्तूच खरेदी करा!
‘‘अनेक विदेशी वस्तू कळत-नकळत आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनल्या आहेत. आपल्या खिशातला कंगवा देशी आहे की विदेशी हेही अनेकदा माहीत नसते. या सगळ्यापासून सुटका करून घ्यायला हवी. ‘मेड इन इंडिया’ वस्तूच खरेदी करायला हव्यात,’’ असे मोदी म्हणाले.
आजपासून 12 आणि 28 टक्के जीएसटी नसेल!
नव्या बदलानुसार जीएसटीचे आता 5 टक्के आणि 18 टक्के हेच स्लॅब राहणार आहेत. 12 टक्के आणि 28 टक्के जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. कालपर्यंत 12 टक्के जीएसटी असलेल्या 99 टक्के वस्तूंवरील जीएसटी 5 टक्के होणार आहे.