
हिंदुस्थानची विकासयात्रा सुरु करण्याची वेळ आली आहे. या विकासयात्रेची आता सुरुवात करून येत्या 25 वर्षांचा प्रवास हा नवीन हिंदुस्थानच्या निर्मितीचा अमृतकाळ असणार आहे. या अमृतकाळात आमच्या संकल्पांची पूर्तता आपल्याला स्वातंत्र्यांच्या 100 वर्षांपर्यंत घेऊन जाईल, असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात व्यक्त केला.
हिंदुस्थानच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला केलेल्या संबोधनात वरील आत्मविश्वास व्यक्त केला. दरम्यान, अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 75 आठवडय़ांमध्ये देशभरात 75 वंदे भारत ट्रेन देशाच्या कोनाकोपऱ्यांत जोडल्या जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणादेखील मोदी यांनी यावेळी केली. तर देशात ज्या वेगाने नवे विमानतळ बांधली जात आहेत आणि उड्डाण योजना दुर्गम भागांना हवाई मार्गाने जोडत आहे, ती देखील अभूतपूर्व असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले.
दरम्यान, हिंदुस्थान ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी व्हावा यासाठी लवकरच नॅशनल ग्रीन हायड्रोज मिशनची स्थापना केली जाणार असल्याची घोषणादेखील त्यांनी यावेळी केली. देशाच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून ऊर्जा विभागाने स्वावलंबी होणे गरजेचे असल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तर या माध्यमातून देशात 2022 पर्यंत 1 लाख 75 हजार मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता गाठण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
सैनिकी शाळांची कवाडे मुलींसाठी उघडणार
देशातील 33 सैनिकी शाळांत यापुढे मुलींनादेखील प्रवेश दिला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. याअगोदर मिझोराममधील सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्याचा प्रयोग करण्यात आला होता. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता देशभरातील तब्बल 33 सैनिकी शाळांत हा प्रयोग राबविला जाणार आहे.
महिलांसाठी ई कॉमर्सचे व्यासपीठ
देशभरात तब्बल 8 कोटींहून अधिक महिला या बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत. या महिलांसाठी ई कॉमर्सचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. बचत गटांच्या माध्यमातून उत्पादन केल्या जाणाऱ्या उत्पादनांना या माध्यमातून देशात आणि विदेशात बाजारपेठ मिळवून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- यापुढे माध्यम भोजन योजना असो किंवा रेशन दुकानांतून दिला जाणाऱ्या तांदळाचा दर्जा सुधारण्यात येणार आहे. 2024 पर्यंत प्रत्येक योजनेद्वारे दिला जाणारा तांदूळ हा पौष्टिक दिला जाणार आहे.
- पंतप्रधान गतशक्ती योजना सुरू करण्यात येणार असून या अंतर्गत 100 लाख कोटी रूपयांच्या योजना राबविल्या जाणार आहे. या अंतर्गत हजारो रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहे.
- हिंदुस्थानी खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये बजावलेल्या सर्वोत्तम कामगिरीच्या पार्श्वभूमीवर खेळात तंत्रज्ञान आणि व्यावसायिकता आणण्यासाठी सुरू असलेली मोहीम यापुढे अधिक तीव्र केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.


























































