केजरीवाल यांच्या शपथविधीला पंतप्रधानांची ‘दांडी’

963

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आम आदमी पार्टीने बहुमत सिद्ध करत विजय मिळवला. त्यामुळे अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा दिल्लीतील रामलीला मैदानावर पार पडला. मात्र, या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र अनुपस्थित होते.

अरविंद केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसैन आणि राजेंद्र पाल गौतम यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जनतेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, हा माझा विजय नसून, तुमचा विजय आहे. प्रत्येक दिल्लीकराचा विजय आहे. हा प्रत्येक आई, बहीण, तरुण, विद्यार्थी आणि दिल्लीतलं प्रत्येक कुटुंब या साऱ्यांचा विजय आहे. गेल्या पाच वर्षांत दिल्लीत सुव्यवस्था राखणं, मुलभूत सोयी सुविधा पुरवणं ही त्यांच्या सरकारची उद्दिष्टं आहेत. गेल्या पाच वर्षांत दिल्लीचा प्रत्येक नागरिक विकासाभिमुख व्हावा याकडे आमचे प्रयत्न राहिले आहेत, असं केजरीवाल यावेळी म्हणाले.

मतदारांना उद्देशून बोलताना केजरीवाल यांनी सर्वांचे आभार मानले. ज्यांनी आपला मत दिलं, त्यांचे आणि भाजप तसंच काँग्रेसला मत देणाऱ्यांचेही आभार केजरीवाल यांनी मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गैरहजेरीवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. पंतप्रधानांना शपथग्रहण सोहळ्याचं आमंत्रण दिलं होतं. मात्र, वाराणसी येथे एका नियोजित कार्यक्रमामुळे त्यांना शपथविधीला उपस्थित राहता आलं नाही, असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या