
सामना ऑनलाईन । कूच बिहार
ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या विकासातील स्पीड ब्रेकर आहेत. या ‘स्पीड ब्रेकर दीदीं’नी केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी बनवलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलेल्या नाहीत. पश्चिम बंगालला गुंडांच्या हवाली करून येथील लोकांचा त्यांनी अपेक्षाभंग केला आहे, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केली.
पश्चिम बंगालच्या कूच बिहार येथील प्रचार सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी ममता यांच्यावर निशाणा साधला. ममता बॅनर्जी यांनी शारदा चिटफंड, रोझ व्हॅली तसेच नारदा यांसारखे घोटाळे करून पश्चिम बंगालची प्रतिमा मलीन केली आहे. सर्वसामान्यांच्या लुटलेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब चौकीदार म्हणून मला हवा आहे, असा शाब्दिक हल्ला त्यांनी यावेळी चढवला.
नागरिकांना तृणमूलच्या गुंडांच्या हवाली केले ‘मोदी हटाव, मोदी हटाव’चा दिवसरात्र ध्यास घेतलेल्या ममतादीदी मतांच्या राजकारणासाठी देशाचे तुकडे करणाऱ्यांसोबत गेल्या. घुसखोरांना पाठीशी घालत पश्चिम बंगालच्या लोकांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या हवाली केली असल्याचेही ते पुढे म्हणाले.
खरा चेहरा समोर यायलाच हवा
पश्चिम बंगालमधील कम्युनिस्टांचे सरकार गेल्यानंतर अशा प्रकारे राज्याचा कारभार चालवला जाईल याची कल्पनाही केली नव्हती. ज्या शारदा देवीला देशभरात बुद्धीचे दैवत म्हणून पुजले जाते, त्यांचेच नाव घेत शारदा चिट फंड घोटाळा करून पश्चिम बंगालचे नाव बदनाम केल़े पश्चिम बंगालमध्ये सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी का लागू केल्या जात नाहीत? नोकरीसाठीच्या परीक्षा पास होऊनही तरुणांच्या नोकरभरतीला ब्रेक का लावण्यात आला आहे? याची उत्तरे दीदींकडे आहेत का, असा सवाल करीत त्यांचा खरा चेहरा समाजासमोर यायलाच हवा, असा हल्ला मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर चढवला.
दीदींची झोप उडालीय
ममता दीदींकडून निवडणूक आयोग तसेच माझ्यावर जी टीका होतेय त्यावरूनच त्यांच्या पायाखालची जमीन सरकलीय हे दिसून येतेय. तुम्ही जितके मोदी मोदी कराल तितकी या स्पीड ब्रेकर दीदींची झोप उडतेय. त्यांना झोप लागत नाही आणि मग त्याचा राग इलेक्शन कमिशनवर निघत असल्याचे मोदी म्हणाले.

























































