‘ऑर्डर ऑफ जाएद’ पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मानित

354

‘ऑर्डर ऑफ जाएद’ या युनायटेड अरब अमिरात (यूएई) देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी यूएईचे संस्थापक शेख जाएद बिन सुल्तान अल नहयान यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी मोदींनी येथे हिंदुस्थानातील रुपे कार्डचेही अनावरण केले आणि या कार्डद्वारे त्यांनी येथील ‘छप्पन भोग’ या दुकानातून मोतीचूर लाडू खरेदी केले. हा सन्मान घेण्यापूर्वी मोदींनी यूएईच्या प्रमुखांशी उच्चस्तरीय चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला फ्रान्स दौरा पूर्ण करून यूएईला शुक्रवारी रात्री पोहोचले. याच वर्षी एप्रिलमध्ये यंदाचा पुरस्कार मोदींना दिला जाणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत व्हावेत हाच या पुरस्कारामागील हेतू आहे. रुपे कार्ड लाँच केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी यूएईमधील व्यावसायिकांशी चर्चा केली आणि हिंदुस्थानात गुंतवणूक करण्याचा त्यांना आग्रह केला. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, राजकीयदृष्टय़ा स्थैर्य आणि योग्य पायाभूत सुविधा यामुळे हिंदुस्थानात गुंतवणूक करणे आता आकर्षक बनले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुपे कार्ड यूएईमधील अमिरात पॅलेसमध्ये लाँच केले आणि त्यानंतर लगेचच येत्या आठवडय़ात येथील अमिरात एनबीडी, बँक ऑफ बडोदा आणि फॅब या तीन बँका हे कार्ड सुरू करणार आहेत. पुढच्या आठवडय़ातच हे कार्ड यूएईमधील प्रमुख दुकाने आणि मॉल्समध्ये स्वीकारले जाणार आहे. यूएईमधील मर्क्युरी पेमेंट सर्व्हिसेस आणि हिंदुस्थानातील नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन यांनी या कार्डच्या सुलभ वापरासाठी एमओयूचे आदानप्रदानही केले. हिंदुस्थानातून यूएईला येणाऱ्या पर्यटकांनाही रुपे कार्डद्वारे खर्च करता येणे सुलभ होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या