कोरोना लसीबाबत पंतप्रधानांनी दिली महत्वाची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या संकटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीबाबत महत्त्वाची माहिती दिली असून येत्या काही आठवड्यात लस येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

सुरुवातीला कोरोना योद्धे आणि वयोवृद्धांना लस देण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत सांगितले.

देशभरात सध्या कोरनावरील 8 लसींवर काम सुरू आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यात लस मिळण्याची शक्यता आहे. वैज्ञानिकांनी मंजुरी दिल्यानंतर लस देण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. सर्वांपर्यंत लस पोहचवण्यासाठी एक विशेष सॉफ्टवेअर बनवण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकार व्यापक स्तरावर लस वितरणासाठी काम करत आहे. राज्य सरकारच्या मदतीने लसीचे वितरण करण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या सूचनेनुसारच यावर काम करण्यात येणार आहे. लसीच्या किंमतीचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे घेतील. जनतेचे मत विचारात घेत लसीची किंमत ठरविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने मोदी यांनी त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्याशीही चर्चा केली होती.