गावांना आत्मनिर्भर करण्याचे विखे-पाटील यांचे कार्य प्रेरणादायी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्ता आणि राजकारणाच्या माध्यमातून डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनी आपले संपूर्ण जीवन लोकांसाठीच अर्पण केले होते. पाणी, शिक्षण आणि आरोग्य या माध्यमातून गावांना आत्मनिर्भर करण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा नामविस्तार समारंभ व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून संपन्न झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हर्च्युअल रॅलीत प्रमुख उपस्थिती होती. प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात हा सोहळा पार पडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात विखे-पाटील परिवाराच्या चार पिढय़ांच्या यशस्वी वाटचालीचा विशेष उल्लेख करत, काही पिढय़ांनी आपल्या  कामातून सातत्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. पद्मश्रींनी सहकार चळवळ सुरू केली. याच माध्यमातून पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनी ग्रामीण लोकांचे दुःख पाहिले. शेतकऱयांना सहकार चळवळीत जोडून ही चळवळ खऱया अर्थाने कुठल्या जातीची आणि धर्माची नसून, सहकार हा निष्पक्ष असतो, हाच संदेश दिला असे पंतप्रधान म्हणाले.

कौशल्य असल्याशिवाय सुशिक्षित माणूसही शेती करू शकत नाही. याच विचाराने विखे-पाटलांनी शेतीसंदर्भात मांडलेला विचार महत्त्वपूर्ण आहे. याच विचाराने केंद्र सरकार शेतकऱयांना सोयी-सुविधा देऊन उद्योजक बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, मोठे उत्पादन घेऊन शेतकऱयांनी देशाची भूक भागविली असली तरी शेतकऱयांच्या नफ्यासाठी यापूर्वी कधी विचार झाला नाही. आता देशात प्रथमच शेतकऱयांच्या फायद्याचा विचार सुरू झाला आहे.

शेतीविषयक कायद्यांचा उल्लेख करून मोदी म्हणाले, ‘पीकविमा आणि खते यामधील अडचणी दूर करण्यासाठी सरकारचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. शेतकरी सन्मान योजनेतून आजपर्यंत 1 लाख कोटी रुपये शेतकऱयांच्या खात्यात वर्ग केले आहेत. कोल्ड स्टोअरेज, मेगा फूडपार्कच्या उभारणीबरोबरच गावातील बाजारापासून ते मंडईपर्यंत शेतकऱयांना सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न  आहे, हाच विचार विखे-पाटील यांनी आत्मचरित्रातून मांडला होता.’

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. विखे पाटील यांच्या  आत्मचरित्रातील गोष्टींचा उल्लेख करत दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी त्यांचे प्रयत्न मोलाचे होते. त्याचे काम आता सुरू झाले असले तरी, आमच्या सरकारमध्ये  या विषयीचे झालेले निर्णय विद्यमान सरकारने पुढे नेण्याची अपेक्षा व्यक्त केली.

ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या ‘मुलखावेगळा माणूस’ या ग्रंथाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी सूत्रसंचालन, तर डॉ. राजेंद्र विखे यांनी आभार प्रदर्शन केले.

 कार्यक्रमास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. सुभाष भामरे, डॉ. भारती पवार, प्रीतम मुंडे, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, भाजप नेते, आमदार हरिभाऊ बागडे, काशिराम पावरा, बबनराव पाचपुते, सुरेश धस, मोनिका राजळे, आशुतोष काळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आण्णासाहेब म्हस्के पाटील, शिवाजीराव कर्डीले बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, पोपटराव पवार, सुनंदा पवार, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अनुराधा नागवडे आदी उपस्थित होते.