एचडीआयएलच्या दोन संचालकांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल)च्या दोघा संचालकांना आज अटक केली. राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान अशी त्या दोघांची नावे आहेत. याबरोबरच आर्थिक गुन्हे शाखेने एचडीआयएलची साडेतीन हजार कोटींची मालमत्तादेखील गोठवली.

कोटय़वधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी पीएमसी बँक आणि एचडीआयएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी एचडीआयएलचे संचालक राकेश आणि सारंग या पितापुत्रांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र चौकशीत दोघांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी दोघांना बेडय़ा ठोकल्या. दरम्यान, हे बाप-लेक देश सोडून बाहेर पळून जाऊ नयेत यासाठी इमिग्रेशन ब्युरोने सोमवारी या दोघांविरोधात लुकआऊट सर्कुलर जारी केले होते. आज अखेर दोघांना अटक झाली.

25 हजार काढण्यास मुभा

रिझर्व्ह बँकेने आज पीएमसी बँकेच्या खातेदारांना 25 हजार रुपये काढण्याची परवानगी दिली. याआधी दहा हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यात वाढ करण्यात आली आहे.