
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बँकेच्या तीन माजी संचालकांचा मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन अर्ज मंजूर केला. गेल्या तीन वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगणाऱया आरोपींची सुटका करतानाच हायकोर्टाने त्यांना काही अटी घातल्या. मात्र बँकेचे मालमत्ता निर्धारक (व्हॅल्यूअर) डॉ. विश्वनाथ श्रीधर प्रभू यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळून लावला.
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या 4355 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे तीन संचालक मुक्ती बाविसी, तृप्ती बने आणि रणजीत नंदराजोग यांना डिसेंबर 2019 साली अटक करण्यात आली. मुक्ती बाविसी या लोन अॅण्ड अॅडव्हान्स समितीच्या, तृप्ती बने या कर्ज वसुली समितीच्या तर रणजीत सिंग हे पीएमसी बँकेच्या संचालक पदावर कार्यरत होते. अटक करण्यात आलेल्या या संचालकांनी सुटकेसाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता.


























































