पीएमसी बँक घोटाळा, वाधवान पिता-पुत्रांचा जेलमधील मुक्काम वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळय़ातील मुख्य आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान या पितापुत्रांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वाधवान पितापुत्रांना आर्थर रोड जेलऐवजी त्यांच्या वांद्रे येथील घरात पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्याला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

वाधवान पितापुत्रांना जेलऐवजी त्यांच्या घरात ठेवण्याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. त्याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पूर्णपीठासमोर यावर सुनावणी झाली. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ईडीच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना वाधवान पितापुत्रांना जेलमध्येच ठेवण्याची मागणी केली. त्याची दखल घेत न्यायालयाने आरोपींच्या कोठडीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांना तात्पुरती स्थगिती दिली आहे.