
पंजाब अँड महाराष्ट्र बँक घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान खातेधारकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. आरबीआय चोर है अशा घोषणा देत खातेधारकांनी निषेध व्यक्त केला. परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांसोबतही संतप्त खातेधारकांनी हुज्जत घातली.
पीएमसी घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खातेदारांना त्यांच्याच खात्यांतून पैसे काढण्यासाठी घातलेल्या निर्बंधामुळे खातेदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. पीएमसी बँकेतील खातेदारांना तत्काळ पैसे मिळावे आणि त्यांचे लॉकर हाताळण्यासाठी एकच नियमावली करण्यात यावी, अशी विनंती शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करून केली होती. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणीही झाली होती. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी खातेदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) अद्याप कुठली पावले उचलली आहेत. तसेच यातून मार्ग काढण्यासाठी पुढील दिशा काय असेल, याची माहिती 13 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात सादर करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आरबीआयला दिला होता. त्यासंबंधीची पुढील सुनावणी 19 नोव्हेंबर रोजी होईल, असेही या आदेशात नमूद होते.
मात्र, मंगळवारी उच्च न्यायालयाने ही सुनावणी 4 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली. स्वतःच्या हक्काचे पैसे बँकेतून काढता येत नसल्याने हवालदिल झालेले खातेधारक या सुनावणीच्या आशेवर होते. मात्र, ही सुनावणी पुढे ढकलल्याने त्यांच्या संतापाचा पारा चढला आणि त्यांनी उच्च न्यायालयाच्या आवारातच आरबीआयविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.





























































