पीएमपीएल बसमध्ये चोर्‍या करणारे जेरबंद

पीएमपीएल बसमध्ये प्रवाशांकडील ऐवज चोरणार्‍या सराईतांना गुन्हे शाखा यूनिट एकच्या पथकाने अटक केली. शहरातील विविध भागात बसेसमध्ये महिलांकडील पर्स, बॅगेतील पैसे चोरल्याचे आरोपींनी कबूल केले. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

अविनाश उर्फ चार्ली सिद्राम जाधव (32), आदर्श नारायण गायकवाड (31, रा. दोघे. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बसमध्ये गर्दीचा फायदा घेत चोर्‍या करणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. अशाप्रकारच्या रोज काही घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर बसप्रवासात चोर्‍या करणार्‍यांचा गुन्हे शाखेकडून शोध घेण्यात येत होता. या दरम्यान बसमध्ये चोरी करणारे चोरटे हे बुधवार चौकाजवळ येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. यानूसार जाधव, गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी शहरातील भारती विद्यापीठ, विश्रांतवाडी, विद्यापीठ, वाघोली बसमार्गावर चोरी केल्याचे समोर आले. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आले असून 96 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यूनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, अजय जाधव, अंमलदार राहूल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर,अभिनव लडकत, दत्ता सोनवणे, महेश बामगुडे, विठ्ठल साळुंखे, तुषार माळवदकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.