नीरव मोदीला ब्रिटन कोर्टाचा दणका, कोठडीत 28 दिवसांची वाढ

nirav-modi-new

पंजाब नॅशनल बँकेला कोटय़वधींचा गंडा घालून फरार झालेला कुख्यात हिरे व्यापारी नीरव मोदी याला गुरुवारी ब्रिटनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने मोठा दणका दिला. न्यायालयाने त्याच्या कोठडीत 28 दिवसांची म्हणजेच 27 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली. ब्रिटनमध्ये त्याच्या प्रत्यार्पणासंबंधी खटल्याची सुनावणी सुरू आहे.

नीरव मोदी सध्या लंडनच्या वॅण्डस्वर्थ तुरुंगात कैद आहे. त्याला तुरुंगातूनच नियमित सुनावणीसाठी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून जिल्हा न्यायाधीश डेव्हिड रॉबिन्सन यांच्यासमोर हजर केले होते. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाबाबत 11 मे रोजी सुनावणी सुरू होणार असून ती पुढील पाच दिवस चालेल असा अंदाज वर्तवला जात आहे. मोदीला गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक झाली होती तेव्हापासून तो वॅण्डस्वर्थ तुरुंगात असून मानसिक आरोग्य बिघडल्याचे कारण पुढे करत त्याने नोव्हेंबर 2019 मध्ये जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र साक्षीदारांवर दबाव टाकला जाईल, तसेच मे महिन्यातील सुनावणी टाळण्याचा डाव असू शकतो या पार्श्वभूमीवर न्यायालयाने नीरव मोदीचा अर्ज फेटाळला होता.

आपली प्रतिक्रिया द्या