पोक्सोचा गुन्हा : येडियुरप्पांचा तपास सुरू; अटकेची टांगती तलवार

बलात्कार पीडितेचा विनयभंग केल्याप्रकरणी ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल झालेले भाजपचे वजनदार नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना बेंगळुरू कोर्टाने समन्स बजावले आहे. उद्या, 2 डिसेंबर रोजी ते न्यायालयात हजर होणार आहेत. येडियुरप्पा यांच्यावरील पोक्सोचा गुन्हा रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात एक महिला तिच्या 17 वर्षीय बलात्कार पीडित मुलीला घेऊन येडियुरप्पा यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेली होती. त्यावेळी एका खोलीत नेऊन येडियुरप्पांनी तिचा विनयभंग केला होता. मुलीच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर येडियुरप्पांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही, साक्षीपुराव्यांच्या आधारे तपास

कर्नाटक सीआयडी याप्रकरणी सखोल तपास करत आहे. गुप्त व्हिडीओ, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीपुराव्यांच्या आधारे सत्य शोधले जात आहे. हे सुरू असतानाच येडियुरप्पा यांनी पोक्सोचा गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका केली होती, ती कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे 82 वर्षीय येडियुरप्पांच्या अडचणी वाढल्या आहेत.