
पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळित राखण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाईचा बडगा कायम ठेवला आहे. भारती विद्यापीठ परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत चुहा गँग टोळीप्रमुखासह त्याच्या दोन साथीदारांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत करण्यात आलेली ही 93वी मोक्का कारवाई आहे.
ईस्माईल मौलाली मकानदार (वय 26, चुहा गँग टोळीप्रमुख), जावेद मेहबुब मुल्ला (वय 27), तौसिफ उर्फ मोसिन उर्फ चुहा जमीर सैय्यद (वय 28, सर्व रा. संतोषनगर, कात्रज) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सराईत ईस्माईल मकानदारने प्रत्येक गुन्हयाच्यावेळी दोन साथीदार घेवुन परिसरात दहशत माजविली होती. खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, दहशत माजविण्याचे गंभीर गुन्हे केले आहेत. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या वतीने चुहा गँगविरूद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव दाखल केला होता.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सागर पाटील, एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, सर्विलन्स पथकाचे एपीआय वैभव गायकवाड, अमलदार चंद्रकांत माने, महेश बारवकर, निलेश ढमढेरे यांनी केली.
आतापर्यंत सराईत 94 टोळ्या गजाआड
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार कारवाईचा बडगा उगारला. त्यानुसार आतापर्यंत 94 सराईत टोळ्यांतील गुन्हेगारांना गजाआड करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गंभीर गुन्ह्यांचा आलेख कमी झाला आहे. दरम्यान, मागील आठ महिन्यांत 31 टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.


























































