पोलिसाचा कर्करोगाने मृत्यू झाल्यास अनुकंपा नाही

पोलिसाचा प्राणघातक जखमी होऊन मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अनुकंपा नोकरी दिली जाते. या तरतूदी अंतर्गत कर्करोगाने निधन झालेल्या पोलिसाच्या वारसाला अनुकंपा नोकरी देता येत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.

पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाने अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला होता. पोलीस उपनिरीक्षक पद ब प्रवर्गात येते. अनुकंपा नोकरी क व ड श्रेणीतील पोलिसाच्या वारसाला दिली जाते, असे नमूद करत पोलीस प्रशासनाने पोलीस उपनिरीक्षकाच्या वारसाला अनुकंपा नोकरी नाकारली.

त्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाच्या वारसाने 2017 च्या राज्य शासनाच्या अध्यादेशाचा दाखला देत अनुकंपा नोकरीसाठी दावा केला. हा दावाही पोलीस प्रशासनाने मान्य केला नाही. पोलिसाला कर्तव्यावर असताना प्राणघातक जखम झाली. या जखमेमुळे पोलिसाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला अनुकंपा नोकरी दिली जाते. हा अध्यादेश क व ड श्रेणीतील पोलिसांसाठी आहे, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.

त्याविरोधात वारसाने महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात (मॅट) धाव घेतली. मॅटने पोलीस उपनिरीक्षकाच्या वारसाला अनुकंपा नोकरी देण्यास नकार दिला. मॅटच्या या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.न्या. ए.एस. चांदुरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने वरील निर्वाळा देत मॅटच्या निकालाला आव्हान देणारी वारसाची याचिका फेटाळून लावली.

न्यायालयाचे निरीक्षण
पोलीस उपनिरीक्षक पद ब प्रवर्गातील आहे. हा प्रर्वग अनुकंपा नोकरीसाठी पात्र नाही. 2017 च्या अध्यादेशाचा विचार केला तर पोलिसाचा प्राणघातक जखमी होऊन मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अनुपंपा नोकरी दिली जाते. याचिकाकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू कर्करोगाने झाला आहे. कर्तव्यावर असताना त्यांना कर्करोग झाला होता. असे असले तरी 2017 च्या अध्यादेशानुसार कर्करोगाने निधन झालेल्या पोलिसाच्या वारसाला अनुकंपा नोकरी देता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.