23 बांगलादेशी घुसखोरांवर मध्यरात्री झडप

844
police-logo

आगाशी,  बोळींज, नालासोपारा येथील सागरीपट्टय़ामध्ये गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी घुसखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दहशतवादविरोधी पथकाने मध्यरात्री अर्नाळ्यात 23 बांगलादेशी घुसखोरांवर झडप घातली असून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. हे सर्व बांगलादेशी भंगारचा व्यवसाय तसेच मोलमजुरी करण्यासाठी येथे आले होते, असे तपासात उघड झाले आहे.

दहशतवादविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांना अर्नाळ्यामध्ये काही बांगलादेशी आल्याची खबर मिळाली होती. त्याआधारे मध्यरात्रीच्या सुमारास एका पथकाने या घुसखोरांना ताब्यात घेतले. राजोडी, कळंब येथून दहा तर अर्नाळ्यातून 13 जणांना  अटक केली असून त्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. पहाटे चारच्या सुमारास अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा नोंदवण्यात आला.

अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांपैकी तीन जणांवर यापूर्वीच मुंबईत विविध प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. बांगलादेशी घुसखोरांमुळे सागरीपट्टय़ामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले असून त्यास आळा घालण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. बांगलादेशाच्या सीमेवरून हे घुसखोर चिरीमिरी देऊन हिंदुस्थानच्या हद्दीत घुसतात. कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवले जाते. ही प्रक्रिया अतिशय किचकट असून त्याचाच फायदा घुसखोर घेत असल्याचे दिसून आले आहे.

रेती व्यवसायातही शिरकाव

डिसेंबर महिन्यात वसई पोलिसांनी अवैधरीत्या रेती उत्खनन करून बोटीने वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली होती. त्यावेळी केलेल्या कारवाईत दोन बोटींसह 13 बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. पालघर जिह्यात मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याचे या घटनेनंतर समोर आले होते.मच्छीमारी व रेती उत्खनन करणाऱ्या व्यावसायतही हे बांगलादेशी घुसखोर मजूर म्हणून काम करीत आहेत. रेती व्यवसायातही आता घुसखोर शिरल्याने पोलिसांनी कसून फिल्डिंग लावली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या