Crime News – छताचे पत्रे फाडून दुकानातील मोबाईल चोरणाऱ्यांना अटक

दुकान बंद असल्याची संधी साधत चोरांनी मागच्या भिंतींच्या विटा काढल्या, छताचे पत्रे फाडले आणि दुकानात घुसून साडेतीन लाखांचे 15 मोबाईल चोरून नेले. गुन्हा करून सटकण्यात आरोपी यशस्वी ठरले; पण पंतनगर पोलिसांनी दोघांनाही पकडून चोरीचे सर्व मोबाईल हस्तगत केले.

पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पटेल चौकात भानूशाली मोबाईल शॉपी आहे. 16 तारखेच्या पहाटे या दुकानात चोरी झाली. आरोपींनी भिंतीच्या विटा काढून छतावरील पत्रे फाडले आणि दुकानात घुसून 15 नवीन मोबाईल फोन चोरून नेले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक लता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष जाधव व पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला असता आरोपी घाटकोपरहून टॅक्सीने आधी शीव येथे गेले. तेथे टॅक्सी बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला गेले. परत टॅक्सी बदलून नवी मुंबईच्या दिशेने गेले. अशा प्रकारे आरोपींनी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. परंतु जाधव व त्यांच्या पथकाने अचूक माग काढत एकाला पिंपरीच्या भोसरीतून तर दुसऱ्याला बेलापूरच्या ‘सी व्ह्यू’ नावाच्या डॉर्मिटरीतून उचलले. चौकशीत दोघांनी गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरलेले सर्व मोबाईल हस्तगत करण्यात आले. हितेश सोलंकी (41) आणि मोहम्मद फिरोज खान (31) अशी दोघांची नावे आहेत.

ऑनलाइन टास्कने घेतला बळी

ऑनलाइन टास्कच्या नावाखाली ठग नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारत आहेत. याच टास्कने युवकाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. सायबर ठगाने दिशाभूल केल्याने युवकाने तणावातून रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. विघ्नेश चौगुले असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अंधेरी रेल्वे पोलिसांनी अकरा महिन्यांनंतर आठ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

रेल्वे अपघातात छिन्नविछिन्न मृतदेह असतात. त्या मृतदेहाचा तपास करणे कठीण असते. घटनास्थळी पोलिसांना एक मोबाईल आढळून आला. वरिष्ठ निरीक्षक नितीन लोंढे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. चौकशीदरम्यान पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये काही अ‍ॅप्स दिसून आले. तांत्रिक माहिती आणि सखोल विश्लेषण केल्यानंतर विघ्नेशची फसवणूक झाल्याचे समोर आले.

पैशांचा पाऊस पाडतो सांगून फसवणूक

पैशांचा पाऊस पाडून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या दोघांना सांताक्रूझ पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. इलियास करीम मुसानी आणि सोहेलभाई शेख अशी त्या दोघांची नावे आहेत.

सांताक्रूझ येथे राहणारे तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून ते आर्थिक अडचणीत होते. या दरम्यान एकाने त्यांची ओळख खान नावाच्या व्यक्तीशी करून दिली होती. तेव्हा तक्रारदार यांनी खानला त्यांच्या पैशाच्या अडचणीबाबत सांगितले.

गेल्या महिन्यात खानने त्यांच्या ओळखीचा साहिल आणि इम्रान हे दोघे मामा–भाचे पैशांचा पाऊस पाडणार असे भासवले. त्यानंतर तक्रारदार यांना भेटण्यासाठी एका ठिकाणी नेण्यात आले. त्याचदरम्यान एकाने काळ्या कपड्याखाली हात घेऊन काही रक्कम काढली. त्यामुळे तक्रारदार यांना त्यावर विश्वास बसला.

यानंतर खान हा सुरत येथे निघून गेला. तक्रारदार हे लालसेपोटी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी गेले. त्यानंतर ते पगली लेन परिसरात गेले. तेथे गेल्यावर त्यांनी दीड लाख रुपये कपड्यात ठेवले. त्यानंतर त्यांना पैशांनी भरलेली एक बॅग दिली. तक्रारदार यांनी ती बॅग उघडली असता त्यात खऱ्याऐवजी खोट्या नोटा असल्याचे उघड झाले.

फसवणूक झाल्याप्रकरणी त्यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा नोंद केला.