
सामना ऑनलाईन । मुंबई
लांब पल्ल्याच्या रेल्वेत चाकूचा धाक दाखवून लूट करणाऱ्या एका चोराला रेल्वे पोलिसांनी वेश बदलून पकडलं आहे. अजय प्रकाश धोडी असं या चोराचं नाव आहे. वांद्रे टर्मिनसमध्ये येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये तो चाकूचा धाक दाखवून चोरी करत होता. रेल्वे पोलिसांकडे लुटीच्या तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी हा मार्ग अवलंबला.
अजय गेल्या काही काळापासून वांद्रे टर्मिनस येथे येणाऱ्या रेल्वेमध्ये चाकू दाखवून प्रवाशांना लुटत होता. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात तर त्याने तीन वेळा लूट केली होती. त्यामुळे पोलिसांनी अजयला पकडण्यासाठी एक वेगळी योजना आखली. त्या योजनेनुसार सीसीटीव्ही फुटेजवरून अजयची ओळख पटवण्यात आली. त्यानुसार त्याच्यावर बारीक नजर ठेवण्यात आली.
पुन्हा एकदा लुटीच्या इराद्याने रविवारी सौराष्ट्र मेलमध्ये शिरलेल्या अजयच्या नकळत काही रेल्वे पोलीस साध्या वेशात गाडीच्या वांद्रे स्थानकाच्या आधीच्या थांब्यावर चढले. अजय चाकू दाखवून काही प्रवाशांकडून पैसे आणि दागिने लुटत असतानाच पोलिसांनी त्याला रंगेहात पकडलं. सध्या अजयला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.
summary- police arrested thief who looted railway passengers






























































