
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अवैध धंद्यांवर ठोस कारवाई करीत अनेक ‘वसुली’ कर्मचारी आणि धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या ६५ पोलीस कर्मचाऱ्यांची महिनाभर ‘उजळणी’ घेऊन त्यांच्या इतरत्र बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याला आज वर्ष पूर्ण झाले. मात्र, ‘वसुली’ पद्धतीत फारसा बदल झालेला नाही. जुन्या हद्दीत पुन्हा तेच चेहरे सक्रिय झाल्याने आणि काही ठिकाणी त्यांची खासगी माणसे काम करत असल्याने पुन्हा ‘उजळणी’ वर्ग घेण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.
आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ विक्रेते, मटका जुगार, बेकायदेशीर स्पा आणि अवैध व्यवसायांवर ठोस कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर काही महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांतील ‘वसुली’साठी ओळखले जाणाऱ्या कर्मचारी लक्ष्य करीत त्यांची बदली केली गेली होती. या बदल्यांना एक वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा तेच कर्मचारी किंवा त्यांचे प्रतिनिधी मूळ हद्दीत सक्रिय झाल्याचे दिसत आहे. शहरातील काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीछुप्या पद्धतीने अवैध धंदे पुन्हा सुरू झाले आहेत. एवढेच नाही, तर गेल्या काही दिवसांत येरवडा, हडपसर, महंमदवाडी, कोंढवा आदी भागांत पोलिसांनी तडजोड करून पैसे उकळण्याचा घटना घडल्या आहेत.
दरम्यान, अशा धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात असलेला सामाजिक सुरक्षा विभाग बंद करण्यात आला आहे. अवैध स्पा आणि वेश्याव्यवसाय रोखण्यासाठी स्वतंत्र अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष अस्तित्वात असला, तरी या यंत्रणेची कार्यक्षमता आणि प्रत्यक्ष कारवाईची आकडेवारी फारशी ठळक नसल्याने ‘ते नेमके करतात काय?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे पोलीस आयुक्तांनी याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
कोर फुरसुंगी गावठी दारू
पुणे आयुक्तालयाच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या लोणी काळभोर, फुरसुंगी, हडपसर परिसरांत अवैध धंद्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. विशेषतः सोलापूर रोडवरील लोणी काळभोर परिसरात गावठी दारू उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यापूर्वी लाखो रुपयांचे दारू गुत्ते पकडले गेले होते. मात्र, सध्या काहीच कारवाई होत नसल्याने या भागात ‘स्थिरतेने अवैध व्यवहार’ चालू असल्याचे चित्र आहे.



























































